खासगी रुग्णालयात युवकाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी नोंदविले तीन डॉक्टरांचे जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 04:17 PM2018-07-11T16:17:12+5:302018-07-11T16:20:55+5:30
खामगाव: शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील एका ३७ वर्षीय युवकाच्या खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू प्रकरणी बुधवारी शहर पोलिसांनी तीन डॉक्टरांचे जबाब नोंदविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील एका ३७ वर्षीय युवकाच्या खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू प्रकरणी बुधवारी शहर पोलिसांनी तीन डॉक्टरांचे जबाब नोंदविले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
माटरगाव येथील उमेश निवृत्ती शेगोकार (३७) यांचा हात दुखत असल्याने खामगाव शहरातील डॉ. दुसाद यांची भेट घेतली. काही महिन्यांपूर्वी अपघातामुळे दुखापत झालेल्या रॉड टाकलेल्या हातावर किरकोळ शस्त्रक्रीया केल्यानंतर हात दुखणार नाही, तसेच ही शस्त्रक्रीया अतिशय किरकोळ असल्यामुळे नातेवाईकांची सोबत असण्याची गरज नसल्याचे डॉ. दुसाद यांनी सांगितले. शिवाय या शस्त्रक्रीयेसाठी दोन-तीन हजार रूपये खर्च येणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे उमेश शेगोकार यांना डॉ. दुसाद यांच्या खासगी दवाखान्यात भरती केल्यानंतर त्यांचे वडील डबा आणण्यासाठी घरी निघून गेले. अडीच महिन्यांपूर्वी अपघातामुळे रॉड टाकलेल्या हाताची परत तपासणी असल्याने, उमेश शेगोकार एकटेच रूग्णालयात होते. दरम्यान, भरती करण्यात आल्यानंतर काही वेळातच ३० जून रोजी उमेश शेगोकार यांचा एका मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी शंका उपस्थित केली. त्यामुळे शेगोकार यांचे इन कॅमेरा शवविच्छेदन केले. दरम्यान, याप्रकरणी रेनबो हॉस्पीटलचे डॉ. दुसाद, डॉ. मनिष अग्रवाल आणि भूलतज्ज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांचे जबाब शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष टाले यांनी नोंदविले. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
दुसाद यांनी उपचारानंतर केले होते दुसºया दवाखान्यात भरती!
उमेश शेगोकार यांना डॉ. दुसाद यांच्या मालकीच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, याठिकाणी शेगोकार यांची प्रकृती खालावल्यामुळे शेगोकार यांच्या वडिलांसह नातेवाईकांची परवानगी न घेताच एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. यावरून नातेवाईकांना डॉ. दुसाद यांच्या प्रामाणिकतेबद्दल शंका उपस्थित झाल्याने, वाद उद्भवला होता. डॉ. दुसाद यांच्या भूमिकेवर संशय आल्याने मृतक उमेशचे वडील निवृत्ती शेगोकार यांनी खामगाव शहर पोलिसात रात्रीच तक्रार नोंदविली होती. त्यानंतर मृतक उमेशचे अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
शव विच्छेदनाचा अहवाल ‘राखीव’!
मृतक उमेश शेगोकार यांच्या पार्थीवावर अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप राखीव ठेवण्यात आला असून, त्यांच्या शरीरातील ७ नमूने काढण्यात आले. यापैकी चार नमुने अमरावती येथील तर तीन नमुने अकोला येथील प्रयोग शाळेत ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
उमेश शेगोकार संशयास्पद मृत्यू प्रकरणी तीन डॉक्टरांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल अद्याप राखीव असून, विस्तृत शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल. पोलिस तपासात आणखी काही निष्पन्न होते का? यादृष्टीकोनातून तपास सुरू आहे.
- संतोष टाले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.