सुविधा शासनाच्या, श्रेय मात्र भाजपाचे: राहुल बोंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:14+5:302021-06-01T04:26:14+5:30
धाड येथील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ना. दरेकर यांनी कोरोना महामारीच्या संकटकाळात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला ...
धाड येथील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ना. दरेकर यांनी कोरोना महामारीच्या संकटकाळात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाचे खंडन करताना राहुल बोंद्रेंनी भाजपावर बोचरी टीका केली. मनाचा मोठेपणा दाखवित महाराष्ट्र राज्य शासनाने औषधी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, टेक्निशियनपासून सफाई कामगारांपर्यंत सर्व सुविधा कोविड महामारीवर मात करण्याकरिता आ. श्वेता महाले यांच्या आधार संस्थेस उपलब्ध करून दिल्या आहेत. याअंतर्गत २९ मे रोजी दरेकर यांनी धाड येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन केले होते. स्टेजवर व इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर कुठेही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांचा फोटो नव्हता. शासनाचा साधा उल्लेखदेखील संपूर्ण कार्यक्रमात कुठेही करण्यात आला नाही, आभार मानणे तर लांबच राहिले. महाराष्ट्रात कोविड काळात सर्वांत जास्त सुविधा भाजपाने केल्याचा दावादेखील त्यांनी करत आधार संस्थेच्यावतीने चिखली आणि धाड येथे उभे राहत असलेले कोविड रुग्णालय हे भाजपामुळे तयार झाले आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप बोंद्रेंनी केला आहे. तसेच एकीकडे शासनाच्या मदतीने कोरोना हॉस्पिटल उघडायचे व त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते भाजप पक्षाने सुरू केले आहे, असे भासवत मदत करणाऱ्या सरकारवरच टीका करायची म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असाच प्रकार होत असल्याचे बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीचा मदतीचा हात
महाविकास आघाडीने कोरोना काळात जनतेला विविध माध्यमातून मदतीचा हात पुढे केला असून, कोविड आजाराकरिता आवश्यक सुविधा, औषधी, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा ताफा शासन युद्धपातळीवर पुरवित आहे. असे असताना सरकारचे धन्यवाद न मानता सर्व कामगिरी भाजपानेच केल्याचा उसना आव भाजपा नेत्यांनी आणू नये, अशी टीका राहुल बोंद्रेंनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.