बुलडाणा जिल्ह्यातील स्वॅब नमुन्यांची आता नागपूरात तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:03 AM2020-07-06T11:03:13+5:302020-07-06T11:03:23+5:30
पूर्वी नमुने अकोला येथे पाठविण्यात येत होते. मात्र, तेथील कोविड सेंटरमधील ताण वाढल्यामुळे नमुने नागपूरला पाठविण्यात येत आहेत.
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूरमध्ये पाठविण्यात येत आहे. त्यामुळे अहवाल यायला विलंब लागत असून, क्वारंटीन केलेल्यांना दोन ते तीन दिवस वाट पहावी लागत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यालगतच्या शहरांमधून येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचे तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांचे स्वॅब नमुने पूर्वी तपासणीसाठी अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येत होते. मात्र, अकोल्यात रूग्ण वाढल्यामुळे रिपोर्ट तपासणीचा ताण वाढला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील नमुने नागपूर येथे पाठविण्यात येत आहे. बुलडाणा ते नागपूर ४०० किमी अंतर आहे. जिल्ह्यातील नमुने विशेष वाहनाने पाठविण्यात येतात. त्यानंतर आॅनलाईन अहवाल प्राप्त होतो. नागपूरवरून अहवाल यायला विलंब लागत असल्यामुळे क्वारंटीन झालेल्या रूग्णांना शासकीय रूग्णालयात तात्कळत बसावे लागत आहे. अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर रूग्णांना सुटी देण्यात येते.
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाची लक्षणे असलेल्या तसेच रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात येत आहेत. पूर्वी नमुने अकोला येथे पाठविण्यात येत होते. मात्र, तेथील कोविड सेंटरमधील ताण वाढल्यामुळे नमुने नागपूरला पाठविण्यात येत आहेत.
- डॉ. प्रेमचंद पंडीत
जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा