मुंबईला जाणारे दुध 'स्वाभीमानी' रोखणार; १६ जुलै पासून आंदोलनात्मक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:59 IST2018-07-04T14:56:43+5:302018-07-04T14:59:40+5:30
बुलडाणा : दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्यावे आणि उसाची थकलेली दोन हजार कोटी रुपयांची एफआरपी त्वरित द्यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबईला होणारा दुध पुरवठा १६ जुलै पासून रोखण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

मुंबईला जाणारे दुध 'स्वाभीमानी' रोखणार; १६ जुलै पासून आंदोलनात्मक भूमिका
बुलडाणा : दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्यावे आणि उसाची थकलेली दोन हजार कोटी रुपयांची एफआरपी त्वरित द्यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबईला होणारा दुध पुरवठा १६ जुलै पासून रोखण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. राज्यात गायीच्या दुधाचे एक कोटी पाच लाख लिटरच्या आसपास संकलन होते. तर दुध संघाला प्रती लिटर तीन रुपये अनुदान देण्यात आले आहे. मात्र दुध संघाने ते अन्यत्र वळवले आहे. प्रकरणी प्रत्यक्ष दुध उत्पदक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतीलिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान थेट जमा करावे, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. कर्नाटकच्या धर्तीवर शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात हे अनुदान जमा करावे, अशी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. सोबतच ऊस उत्पादक शेतकर्यांची दोन हजार कोटी रुपयांची एफआरपी थकलेली आहे. तीही त्वरेने देण्यात यावी, अन्यथा १६ जुलै पासून मुंबईला होणारा दुधाचा पुरवठा रोखण्यात येईल, असा इशाराच स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. विदर्भातूनही मुंबईला जाणारे दुध रोखण्यात येईल, असे तुपकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विदर्भातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या प्रश्नावरही स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतलेली असून २८ जून रोजी अमरावती येथे यासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. विदर्भातही या दोन्ही पिकाच्या भावासंदर्भात स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून विदर्भातही आक्रमक पवित्रा या पिकांच्या भावा संदर्भात घेणार असल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले आहे.