‘स्वाभिमानी’ने महावितरण कार्यालयाची तोडली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:39+5:302021-03-16T04:34:39+5:30
दरम्यान, जोपर्यंत खंडित करण्यात आलेली वीज जोडणी पूर्ववत जोडली जात नाही, तोवर अधीक्षक अभियंत्यांच्या केबिनमधून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी ...
दरम्यान, जोपर्यंत खंडित करण्यात आलेली वीज जोडणी पूर्ववत जोडली जात नाही, तोवर अधीक्षक अभियंत्यांच्या केबिनमधून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. परिणामी महावितरणने दुपारपर्यंत ६० वीज रोहित्रांचा तोडलेला वीजपुरवठा पूर्ववत केला होता. मात्र सर्वच जोडण्या पूर्ववत करण्याची मागणी आक्रमकपणे तुपकरांनी रेटल्यामुळे अधिकारी वर्गालाही गप्प व्हावे लागले.
अलीकडील काळात अशा प्रकारचे हे एक आक्रमक आंदोलन म्हणावे लागेल. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. त्यातच मुख्यालयाची वीज तोडल्याने कार्यालय अंधारात होते. शेतकऱ्यांना अंधारात ठेवाल तर तुम्हाला उजेडात राहू देणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही या वेळी तुपकरांनी अधिकाऱ्यांना दिला होता. महावितरणच्या या मोहिमेच्या विरोधात शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांचीही भेट घेत शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करण्याची मागणी केली होती. तसे झाल्यास महावितरणचीच वीज खंडित करू, असा इशारा त्या वेळी तुपकरांनी दिला होता. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह थेट महावितरणचे जिल्हा मुख्य कार्यालय गाठत तेथील वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे कार्यालयात खळबळ उडाली होती. शेतकऱ्यांना लाखांची दिली गेलेली देयके ते टप्प्याटप्प्याने भरत आहेत. मात्र वसुलीसाठी शेतकऱ्यांना जोरजबरदस्ती करू नका अन्यथा शेतकरी भडकतील, असा इशाराही तुपकर यांनी या वेळी अधीक्षक अभियंता यांना दिला. त्यांची आक्रमकता पाहता देवहाते यांनी अमडापूर फिडरवरील ६० वीज रोहित्रांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत केला. उर्वरित ठिकाणचाही वीजपुरवठा जोडण्याचे काम सुरू होते. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन, पवन देशमुख, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, शेख रफिक शेख करीम, अंकुश सुसर, गोटू जेऊघाले यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
तुम्ही पण अंधारातच राहा
‘आम्ही अंधारात तर तुम्ही पण अंधारात’ या भूमिकेतून आमचा शेतकरी आता वागेल. वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित केला गेला तर आम्हीही महावितरण कार्यालयाची वीज कापू, असा इशारा तुपकरांनी दिला आहे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असेही तुपकर म्हणाले. दरम्यान, अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानंतरही सक्तीने वीज देयकांय्या वसुलीचे ऊर्जामंत्री वक्तव्य करतात. त्यामुळे सरकारमध्येच आपसात ताळमेळ नसल्याची टीका तुपकर यांनी केली.