पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 04:37 PM2018-05-24T16:37:24+5:302018-05-24T16:37:24+5:30
बुलडाणा : पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
बुलडाणा : पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन वाढीव दर कमी करण्याची मागणी करण्यात आली. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून महागाई वाढली आहे. सर्वच वस्तुंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वाहने वापरणे अशक्य झाले आहे. अनेकांनी शेती विकून, कर्ज काढून वाहने विकत घेतले. प्रवासी वाहतूक करुन ते कुटूंबाचा प्रपंच चालवितात. मात्र शासनाकडून सातत्याने पेट्रोल, डिझेलचे भाव वाढविले जात आहेत. त्यामुळे वाहने शोभेची वस्तू झाले आहेत. शासनाचा व भाववाढीचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख शेख करीम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना राणा चंदन म्हणाले, भाजप सरकार घोषणांचा पाऊस पाडते. प्रत्यक्षात कारवाई काहीच करीत नाही. या सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सामान्य माणसाला दिलासा देऊ, रोजगार देऊ, नोकरभरती करु अशा पोकळ बिनबुडाच्या घोषणा सरकार करीत आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने वाहनधारकांना वाहन चालविणे अशक्य झाले आहे. त्यापेक्षा सालकल चालविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शासनाने पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी कराव्या अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी बबनराव चेके, महेंद्र जाधव, गंगाधर तायडे, गणेश शिंगणे, सैय्यद ताज, हरीभाऊ उबरहंडे, बंडू शेळके, पप्पू शेळके, सोनु शेळके, समाधान शिंगणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.