'स्वाभिमानी'ने केले चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 07:38 PM2021-02-06T19:38:05+5:302021-02-06T19:38:17+5:30
Farmers Protest स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी वरवंड फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले.
बुलडाणा: कडाक्याच्या थंडीतही दिल्लीत लाखो शेतकरी आपल्या जिवाची पर्वा न करता केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात आंदोलन करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी या आंदोलनात हुतात्म्य पत्करले. परंतु तरीही केंद्र सरकार हे कायदे रद्द करायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासह केंद्र सरकारच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी वरवंड फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले.
दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांऐवजी उद्योजकांच्या फायद्याचे असलेल्या तीन शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे, यासाठी हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासह केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ फेब्रुवारी रोजी बुलडाणा ते नागपूर मार्गावरील वरवंड फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले. स्वाभिमानीचे युवा विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात 'स्वाभिमानी'चे शे. रफिक शे. करीम, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, राजेश गवई, गजानन गवळी, नेहरूसिंग मेहेर, मारोती मेढे, गोपाल जोशी, शेख आझाद, विष्णू धंदर, संतोष गवळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.