हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद, शुकदास महाराजांचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:48 PM2020-01-18T12:48:20+5:302020-01-18T12:48:38+5:30
लाखो भाविक-भक्तांच्या १०० रांगा, त्यातून पुरी व वांगेभाजी घेऊन निघालेले १०१ ट्रॅक्टर्स आणि त्यातून वैदर्भिय चवीसाठी देशभर ख्यातकीर्त पावलेला अनोखा महाप्रसाद वाटप हिवरा आश्रम येथे १७ जानेवारीला झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम: लाखो भाविक-भक्तांच्या १०० रांगा, त्यातून पुरी व वांगेभाजी घेऊन निघालेले १०१ ट्रॅक्टर्स आणि त्यातून वैदर्भिय चवीसाठी देशभर ख्यातकीर्त पावलेला अनोखा महाप्रसाद वाटप हिवरा आश्रम येथे १७ जानेवारीला झाले. यावेळी सहा हजार स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथकाचे प्रदर्शन भाविकांनी अनुभवले.
शुकदास महाराज व स्वामी विवेकानंदांचा जयघोष ही महापंगत पार पडली. महाप्रसाद वितरणाची सुरूवात जेष्ठ उद्योगपती व शिक्षणमहर्षि नानजीभाई ठक्कर यांच्याहस्ते झाले. यावेळी राज्याचे अन्न व औषध मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनिषा पवार, जालनाचे उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, काँग्रेसचे जेष्ठ नेते श्याम उमाळकर, बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाष्करराव ठाकरे, काँग्रेसचे जेष्ठ नेते लक्ष्मण घुमरे, भाजपचे जेष्ठ नेते सुभाषआप्पा खबुतरे, मुंबईतील जेष्ठ उद्योगपती एकनाथराव दुधे, पुरूषोत्तम सांगळे, बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, भाजपचे नेते संजय चेके-पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भाष्करराव मोरे, ऋषी जाधव, मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव, आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्यावतीने त्यांचे बंधू प्रमोद रायमूलकर, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय वडतकर, अंजनगाव सूर्जी येथील देवनाथ पीठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज, आसोबा संस्थानचे अध्यक्ष भारती महाराज, काँग्रेसचे मेहकर तालुका अध्यक्ष देवानंद पवार, गजानन सावंत, संपतराव देशमुख, जिजाऊ पतसंस्थेचे अध्यक्ष नंदाराम काळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश बोचरे, सुरेश मवाळ, माजी उपसभापती बबनराव लहाने आदी उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांनीही या अनोख्या चवीसाठी प्रसिद्ध पावलेल्या महाप्रसादाचा लाभ घेऊन आनंद व्यक्त केला. या भाविकांना प्रविण शेळके यांच्यावतीने आरओचे शुद्धपाणी मोफत वाटप करण्यात आले. ही महापंगत यशस्वी करण्यासाठी विवेकानंद आश्रम परिवारासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सहा हजार स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याचे संचलन वेदान्ताचार्य गजाननदादा शास्त्री व प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी केले. हा महासोहळा यशस्वी करण्यासाठी साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता.