स्वराज्याप्रमाणेच सर्वांना न्याय देणारे शासन हवे : महाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:43 AM2021-06-09T04:43:03+5:302021-06-09T04:43:03+5:30
चिखली : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना न्याय दिला होता. म्हणूनच तळागाळातील गोरगरीब जनतेला छत्रपती शासन स्वराज्य वाटत होते. मात्र, ...
चिखली : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना न्याय दिला होता. म्हणूनच तळागाळातील गोरगरीब जनतेला छत्रपती शासन स्वराज्य वाटत होते. मात्र, सध्याची स्थिती पाहता राज्य सरकारला मराठा आरक्षणासह ओबीसींचे राजकीय आरक्षणसुद्धा टिकविता आले नाही. राज्यातील जनता कोरोनामुळे हैराण असल्याने त्यातही सरकारची कामगिरी निराशाजनक आहे. परिणामी समाजातील कोणताही घटक आज खुश नाही आहे. राज्यातील प्रत्येकाला हे राज्य स्वत:चे राज्य वाटेल, सर्वांना न्याय मिळेल, अशा शासनाची आज खरी गरज असल्याने, सरकारने आपल्या कारभारात सुधारणा करावी, असे प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी केले.
चिखली पंचायत समितीच्या प्रांगणात आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. छत्रपती शिवरायांच्या जयघोषात ही स्वराज्यगुढी आ. महाले यांच्या हस्ते उभी करून राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी पं. स. सभापती सिंधू तायडे, पंडितराव देशमुख, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, संतोष काळे पाटील, अंकुशराव तायडे, गटविकास अधिकारी हिवाळे, गटशिक्षण अधिकारी शिंदे, बालविकास अधिकारी गवळी, पाटोळे, सुरेश इंगळे, भागवत पाटील व कर्मचारी वृंद उपस्थित होते. दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज आ. महाले यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, न. प. सभापती विजय नकवाल, सुभाषअप्पा झगडे आदी उपस्थित होते.