सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:38+5:302021-08-12T04:39:38+5:30
विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा : जिल्हाभरात कामगारांचा सहभाग चिखली : सफाई कामगारांच्या प्रलंबित २५ मागण्यांसंदर्भाने शासन व ...
विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा : जिल्हाभरात कामगारांचा सहभाग
चिखली : सफाई कामगारांच्या प्रलंबित २५ मागण्यांसंदर्भाने शासन व प्रशासनास आठ ऑगस्टचा ‘अल्टिमेटम’ देऊनही सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने सोमवारी क्रांतीदिनी पुकारलेल्या एकदिवसीय कामबंद आंदोलनात चिखलीत सर्व सफाई कामगारांनी सहभागी होत आंदोलन यशस्वी केले. दरम्यान, सफाई कामगारांच्या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
सफाई कामगारांच्या विविध २५ मागण्यांसंदर्भाने अ.भा. सफाई मजदूर काँग्रेसने नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी एकदिवसीय कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात चिखलीतील सर्व सफाई कामगारांनी सहभागी होत कामबंद आंदोलन केले. या आंदोलनास विविध सामाजिक संघटना, तसेच महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक, प्रदेशाध्यक्ष जयसिंह कच्छवाह, सर्व प्रदेश उपाध्यक्ष, सचिव, महामंत्री व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कामगारांनी या आंदोलनात सहभागी होत हे आंदोलन यशस्वी केले आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगर पंचायतीअंतर्गत सफाई कामगारांनी त्या-त्या ठिकाणी कामबंद आंदोलन करून पदाधिकारी व सफाई कामगारांनी या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी केल्याची माहिती अ.भा. सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय नकवाल यांनी दिली. या आंदोलनादरम्यान पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले असून, सफाई कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कामगारांच्या हक्कासाठीचा हा लढा तीव्र करण्याचा इशारा याद्वारे देण्यात आला आहे.