स्वाइन फ्लूचा धोका वाढला!
By admin | Published: May 19, 2017 12:08 AM2017-05-19T00:08:52+5:302017-05-19T00:08:52+5:30
नगरपालिकेच्या निविदेकडे दुर्लक्ष : डुकरे पकडण्याची मोहीम कागदावरच!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: डुकरांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला स्वाइन फ्लू ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. शहरात डुकरांची संख्या वाढली असून, डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यासाठी नगरपालिकेने निविदा काढली आहे; मात्र डुकरे पकडण्याची मोहीम कागदावरच असल्याने बुलडाण्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे.
स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो. स्वाइन इन्फ्लुएन्झा किंवा स्वाइन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे; हा डुक्करामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. त्यामुळे डुकरांची वाढती संख्या व अस्वच्छता स्वाइन फ्लूसारख्या विषाणूजन्य आजारांना आमंत्रण देत आहे. बुलडाणा शहराच्या प्रत्येक चौकात व सार्वजनिक ठिकाणी डुकरांचा वावर दिसून येत आहे. तसेच मोकळ्या मैदानामध्ये व घाणीने तुंबलेल्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डुकारांचे प्रमाण वाढले आहे. बुलडाणा शहर व ग्रामीण परिसरात सध्या स्वाइन फ्ल्यूचा कहर सुरू असून, स्वाइन फ्लूसाठी कारणीभूत ठरत असलेल्या डुकरांचा मात्र मुक्त संचार आहे. शहरातील बसस्थानक, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातही डुकरांचा सर्रास वावर असल्यामुळे स्वाइन फ्ल्यूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. डुकरांची वाढती संख्या शहरवासीयांच्या अरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नागरिकांसाठी डुकरांचे वाढते प्रमाण डोकेदुखी ठरत आहे.
डुकरांची संख्या वाढत असल्याने व त्यावर पयबंद घालण्यासाठी नगरपालिकेने शहरातील डुकरे पकडण्याकरिता आठ दिवसाअगोदर एक निविदा काढली आहे.
निविदा भरताच डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याने प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. निविदेव्यतिरिक्त पकडलेल्या प्रत्येक डुकरामागे निविदाधारकास वेगळा मोबदलाही देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पकडलेली डुकरे कुठेही विकण्याची मुभा नगर पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे; मात्र नगरपालिकेने निविदा काढल्यानंतरही शहरात डुकरे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरवासीयांना स्वाइन फ्लूसारख्या विषाणूजन्य आजराचा धोका निर्माण झाला आहे.