मनसेच्यावतीने प्रतीकात्मक दहीहंडी साजरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:27+5:302021-09-02T05:14:27+5:30
चिखली : हिंदुत्वाचा आव आणणारे सत्तेत सहभागी असतांनाही आज महाराष्ट्रामध्ये मंदिरे बंद आहेत. तसेच हिंदूंच्या सण उत्सव साजरे करण्यावर ...
चिखली : हिंदुत्वाचा आव आणणारे सत्तेत सहभागी असतांनाही आज महाराष्ट्रामध्ये मंदिरे बंद आहेत. तसेच हिंदूंच्या सण उत्सव साजरे करण्यावर बंधने घालण्यात येत आहेत. यांचे हिंदुत्व बेगडी असून जनतेसमोर यांचा मुखवटा गळून पडला आहे. शासनाने आता जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तात्काळ मंदिरे दर्शनासाठी उघडी करावी अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी दिला.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनसेच्यावतीने ३१ ऑगस्ट रोजी प्रतीकात्मक दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष मतदनराजे गायकवाड यांनी सरकारवर टीका करीत मंदिरे व प्रार्थना स्थळे उघडण्याची मागणी केली. दरम्यान, सरकार विरोधात जोरदार नारेबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, शेतकरी सेल जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भवर, शहर उपाध्यक्ष पंकज सुरडकर, विजय शिंगणे, माजी जिल्हा उपाध्यक्ष राजेश परिहार, मनविसे शहराध्यक्ष अंकित कापसे, रस्ते व आस्थापना जिल्हाध्यक्ष नारायण देशमुख, संदिप नरवाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलिसांनी ९ जणांना केले स्थानबध्द !
गतवर्षाप्रमाणे वषीर्ही दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली आहे, असे असताना देखील मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक दहीहंडी फोडून दहीहंडी उत्सव साजरा केला. दरम्यान, हंडी फोडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. कोरोनामुळे सरकारने निर्बंध घातले असतानाही दहीहंडी फोडल्याने चिखली पोलिसांनी जिल्हाध्यक्ष गायकवाड यांच्यासह ९ जणांना स्थानबध्द केले.