प्राथमिक शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 02:13 PM2019-11-30T14:13:06+5:302019-11-30T14:13:47+5:30
संग्रामपूर पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे.
वरवटबकाल : शिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा संग्रामपूरच्या वतीने संग्रामपूर पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, सहावा वेतन आयोग थकबाकी मिळणे बाबत, वेतन तफावत, भविष्य निर्वाह निधी, डी.सी.पी.एस. धारकांचा सहावा वेतन आयोग हप्ता जमा करण्यासंदर्भात शिक्षक संघटनेने नेहमी पाठपुरावा केला. याच अनुषंगाने संग्रामपूर गटशिक्षणाधिकारी यांना तालुक्यातील शिक्षकांच्या विविध प्रकारच्या समस्या निवारण सभा घेण्यात आली. शिक्षकांच्या समस्या मांडुन २० जुलै २०१९ रोजी समस्या निवारण सभेत शिक्षकांचे विविध प्रश्न व समस्या गटशिक्षणाधिकारी यांच्या समक्ष मांडण्यात आल्या होत्या. वेळोवेळी पाठपुरावा पण केला परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून अद्यापही काही महत्वाच्या समस्या सोडवण्याबाबत तत्परता दिसली नाही, त्यानंतर अनेक समस्या वाढतच गेल्या. वैयक्तिक शिक्षकांचे अनेक प्रश्न व समस्या ह्या तशाच पेडींग राहत असल्याने त्यानुसार अ.भा.शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष दि.रा.भालतडक, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील, राज्य चिटणीस गौतमराव मारोडे यांच्या मार्गदर्शनात एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात शिक्षकांच्या सर्व पेडींग समस्या मांडण्यात आल्या होत्या. १९ नोव्हेंबररोजी लाक्षणिक उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या मागण्याची पूर्तता झाली नसल्याने पंचायत समिती समोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका संग्रामपूर च्या वतीने लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. यामध्ये राज्य चिटणीस गौतमराव मारोडे, तालुकाध्यक्ष शाम कौलकार, शिक्षक पतसंस्था अध्यक्ष भास्कर डोसे, शिक्षक अनिल धनभर, मिलिंद सोनोने, देविदास बावस्कर, सुधीर दाते, संतोषराव मोरखडे, प्रेमलाल जावरकर ,वसंत खंडारे,उमाशंकर रंगभाल ,सौ मंदा टाले,आशा रौदळे, तुळशीराम काळपांडे,शंकर बाजोड,श्रीहरी सोळंके,भास्कर डोसे, मनोहर खंडेराव,संतोष शेडके,मुकुंद भटकर यांच्यासह आदी प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सह शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी मिळत नाही तोपर्यंत लाक्षणिक उपोषण सोडणार नाही अशी भूमिका म.रा.प्राथमिक शिक्षक संघ संग्रामपूर शाखेने घेतली असल्याचे राज्य चिटणीस गौतमराव मारोडे यांनी सांगितले.