जिल्ह्यात १७ ब्लॅक स्पॉट, यंत्रणा करणार निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:41 AM2021-02-17T04:41:12+5:302021-02-17T04:41:12+5:30
त्यातच चिखली-देऊळगाव राजा, चिखली- मेहकर या मार्गांचे काम झाल्यामुळे या मार्गावरील काही ब्लॅकस्पॉट निष्कासित झाल्यात जमा आहेत. अद्यापही सिंदखेड ...
त्यातच चिखली-देऊळगाव राजा, चिखली- मेहकर या मार्गांचे काम झाल्यामुळे या मार्गावरील काही ब्लॅकस्पॉट निष्कासित झाल्यात जमा आहेत. अद्यापही सिंदखेड राज- ते मेहकर मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील केळवद येथील ब्लॅक स्पॉट कायम आहे. मात्र यापैकी काही ठिकाणी गतीरोधक, सूचना फलक तथा दिशादर्शक फलक लावून यंत्रणेने उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात २०१८ मध्ये ६४८ अपघातांमध्ये ३०४ व्यक्तींचा मृत्यू झाला होता तर २०१९ मध्ये ५७२ अपघातांमध्ये ३१९ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात प्रामुख्याने चिखली-देऊळगाव राजा आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेल्या पाच ते सहा वर्षांत ‘किलर ट्रॅक’ म्हणून समोर आला होता. दरम्यान, जिओ टॅगिंग करून जिल्ह्यातील हे १७ ब्लॅक स्पॉट २०१८ मध्ये शोधण्यात येऊन अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत होत्या. आता यंत्रणाही ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून उपाययोजना करत आहेत.
अपघाताची प्रमुख कारणे
जिल्ह्यातील १७ ब्लॅक स्पाटच्या परिसरात प्रामुख्याने तीव्र वळण, टी पाईंटवर गतीरोधक नसणे, तीव्र उताराचे वळण, अरूंद रस्ता, वळण आणि अरूंद रस्ता, तीव्र उतार तथा अरूंद रस्ता, वाहनांची अधिक वर्दळ या कारणामुळे अपघात झाल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले होते. त्यातच जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये केंद्र सरकारच्या रस्ते व वाहतूक व महामार्ग विभागाच्या २८ ऑक्टोबर २०१५ च्या पत्रकातील व्याख्येनुसार हे ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले होते.
या ठिकाणी गाडी जपून चालवा
सावरगाव माळ, सिंदखेड राजातील टी पॉईंट, टेंभुर्णा फाटा, आमसरी फाटा, कलोरी फाटा यासह अन्य काही ठिकाणी वाहने जपून चालविण्याची गरज आहे. या भागात अपघात पूर्वी घडलेले आहेत.
जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटची ठिकाणे
बुलडाणा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्गातर्गत सावरगाव, सावखेड तेजन फाटा, मोती तलाव, राहेरी बुद्रुक, अंचरवाडी फाटा, बरटाळा फाटा, कॅनल पूल, नागझरी फाटा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाडी पेट्रोल पंप, तराडा फाटा, कोलारी फाटा, टेंभुर्णा फाटा, आमसरी फाटा, नायदेवी फाटा, नागपूर-औरंगाबाद मार्गावर चांगाडी ब्रीज हे १७ ब्लॅकस्पॉट २०१८ मध्ये जिअेा टॅगिंगद्वारे या ठिकाणचे अक्षांश व रेखांश मिळवून काढण्यात आले होते. या ब्लॅक स्पॉटवर अपघात टाळण्यासाठी यापूर्वी अंदाजपत्रकेही तयार करण्यात आली होती. रस्त्याच्या साधारणत: ५०० मीटर लांबीच्या तुकड्यात मागील तीन वर्षांत पाच रस्ते अपघात झाले आहेत आणि त्यात व्यक्ती मृत किंवा जखमी झाला आहे, याची माहिती घेऊन हे स्पॉट ठरविण्यात येतात.