वनसंवर्धनामुळेच ज्ञानगंगात स्थिरावतोय ‘टी-वन सी-वन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:03 PM2020-03-20T17:03:10+5:302020-03-20T17:03:32+5:30
तेलीणीची गुहा, लाख्याचा झिरा, ज्ञानगंगा प्रकल्प, विविध प्रजातीची फुलपाखरे, नील गायीसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात विस्तारलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात वनसंवर्धनाच्या कामाला प्राधान्य दिल्यामुळेच ज्ञानगंगा अभयारण्यात टी वन सी वन हा वाघ स्थिरावत असल्याचे चित्र आहे.
२१ मार्च हा जागतिक वनसंवर्धन दिन आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील वनांच्या स्थितीची माहिती घेतली असता ही बाब पुढे येत आहे. वर्तमान स्थितीत टी वन सी वन हा ज्ञानगंगात नसला तरी अजिंठा पर्वत रांगांमध्ये सद्या साथीदाराच्या शोधात भटकत आहे. जवळपास तीन वेळा ज्ञानंगगा अभयारण्य सोडून टी वन सी वन बाहेर गेला मात्र पुन्हा ज्ञानगंगातच परत आला आहे. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातील वातावरण त्यास भावले असून त्यास येथे साथीदाराची सोबत दिल्यास व्याघ्र प्रकल्पाच्या दिशने बुलडाण्या लगतच्या ज्ञानगंगा अभयारण्याची पावले पडू शकतात.
त्यादृष्टीने सध्या पाच सदस्यीय समिती सध्या ज्ञानगंगा अभयारण्याचा अभ्यास करत आहेत. येत्या २५ मार्च रोजी त्यासंदर्भातील अहवाल वन्यजीव विभागाकडे सोपविण्यात येणार आहे. चिखली, बुलडाणा, खामगाव आणि मोताळा या चार तालुक्यांच्या सिमावर्ती भागात ज्ञानगंगा अभयारण्य वसलेले आहे. प्रामुख्याने अस्वलांसाठी ज्ञानगंगा अभयारण्य प्रसिद्ध आहे. त्यात आता टी वन सी वन ची भर पडली आहे. एकंदरीत ज्ञानगंगा अभयारण्यात वन संवर्धनाला प्राधान्य दिल्यामुळेच येथील वनसंपदा वृद्धींगत होण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच टीपेश्वरमधील टी वन सी वन हा येथे स्थिरावण्याची शक्यता आहे. सध्या हा वाघ अजिंठा पर्वत रांगांमध्ये आहे. वन पर्यटनाच्या दृष्टीने ज्ञानगंगा अभयारण्या प्रसिद्ध असून तेलीणीची गुहा, लाख्याचा झिरा, ज्ञानगंगा प्रकल्प, विविध प्रजातीची फुलपाखरे, नील गायीसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे.