‘श्वेता महाले यांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करा!’
By Admin | Published: July 14, 2017 12:46 AM2017-07-14T00:46:40+5:302017-07-14T00:46:40+5:30
जि.प.सभापती श्वेता महाले पाटील यांना धक्काबुक्की करणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्यावतीनेकरण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जि.प.सभापती श्वेता महाले पाटील यांना धक्काबुक्की करणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत १३ जुलै रोजी चिखली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, या निवेदनात शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली; मात्र राजकीय हेतूने या कर्जमाफी विरोधात कांगावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एल्गार आंदोलनाचा फार्स १२ जुलै रोजी बुलडाणा येथे केला, तर या आंदोलनाच्या नावाखाली चाललेल्या नाटकाचे पितळ उघडे पाडण्यासाठी भाजपाच्या श्वेता महाले यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिआंदोलन पुकारले. लोकशाही मार्गाने व शांततामय पद्धतीने भूमिका मांडत असताना काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी श्वेता महाले यांना धक्काबुक्की करून त्यांचे मंगळसूत्रसुद्धा तोडले असल्याचे नमूद करून काँग्रेस पक्षाकडून दंडलीचा वापर करून महाले यांच्याशी केलेली वागणूक असभ्य व अशोभनीय आहे.
राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याच्या नावलौकिकाला कमीपणा आणणारी असल्याचा आरोप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केला असून, याप्रकरणी दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंजाबराव धनवे यांच्या नेतृत्वात देण्यात आला आहे.
यावेळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस गोपाल देव्हडे, शहराध्यक्ष बाळासाहेब हांडगे, शे.अनिस, गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, विजय नकवाल, गजानन भुसारी, आयुष कोठारी, चेतन देशमुख, संतोष काळे, विक्की हरपाळे, अनमोल ढोरे, उदय भुसारी, रमेश आकाळ, जय बोंद्रे, अशोक अंभोरे, आकाश महाजन, विजय वाळेकर, आकाश चुनावाले आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.