त्या दाेषी पाेलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:02+5:302021-07-02T04:24:02+5:30
चिखली : परभणी जिल्ह्यातील दैठाणा पोलीस स्टेशनमध्ये शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष माधव शिंदे यांना मारहाण ...
चिखली : परभणी जिल्ह्यातील दैठाणा पोलीस स्टेशनमध्ये शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष माधव शिंदे यांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत या प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दैठाणा पोलीस स्टेशनमध्ये शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष माधव शिंदे एका तक्रारीची पोच घेण्यासाठी गेले हाेते. त्याठिकाणी ती देण्यास नकार दिल्यावर देखील मागणी सुरूच ठेवल्याने त्यांच्यावर चिडून जात त्याठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी बळीराम मुंढे यांनी त्यांना बेदम मारहाण केली आहे, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी चिखली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामार्फत करण्यात आली आहे.
आंदाेलनाचा इशारा
तातडीने कारवाई न झाल्यास दैठाणा पोलीस स्टेशनला कुलूप ठोकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, भानुदास घुबे, मुरली महाराज येवले, शेषराव शेळके, अंकुश तायडे, किशोर सोळंकी आदींची स्वाक्षरी आहे़