गाैणखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:30 AM2021-03-15T04:30:36+5:302021-03-15T04:30:36+5:30
मेहकर : तालुक्यात व ग्रामीण भागातील रस्त्यावर विना परवाना रेतीची मोठ्या गाड्यांतून वाहतूक होत असून, यामुळे रस्त्याचे नुकसान होत ...
मेहकर : तालुक्यात व ग्रामीण भागातील रस्त्यावर विना परवाना रेतीची मोठ्या गाड्यांतून वाहतूक होत असून, यामुळे रस्त्याचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे शासनाचा महसूल बुडतोय. यामुळे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राकाॅचे उपाध्यक्ष गिरीधर ठाकरे पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
दिग्रस तालुका देऊळगाव राजा येथून वडगाव माळी, चायगाव मार्गे रात्री शेकडो जड टिप्पर ८० टन रेती भरून मेहकर व परिसरातील ग्रामीण भागात रेतीची वाहतूक केली जाते. मेहकर शहरात व परिसरात गौण खनिज, मुरुम, वीट व गिट्टीचीसुद्धा जड वाहतूक अवैधरीत्या विनापरवाना सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील जनता, प्रवासी व लहान वाहनधारक त्रस्त होत आहेत. शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. एकीकडे रेती घाट गौण खनिज लिलाव करून शासन करोडो रुपयांचा महसूल प्राप्त करते, तर दुसरीकडे काेट्यवधी रुपयांच्या रस्त्याची चाळण रेती व गौण खनिज जड व अवैध वाहतुकीने होते.
या गंभीर समस्यासाठी गिरीधर पाटील ठाकरे यांनी तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे.