बनावट अल्पसंख्याक दर्जाप्रकरणी कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:38 AM2021-09-06T04:38:26+5:302021-09-06T04:38:26+5:30
मेहकर : शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केलेले अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकारी तथा सहसचिव अल्पसंख्याक ...
मेहकर : शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केलेले अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकारी तथा सहसचिव अल्पसंख्याक विभाग मंत्रालय मुंबई यांनी जानेवारी २०२० मध्येच रद्द केले. मात्र, शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून बनावट कागदपत्रांचा आधार घेणाऱ्या जनता एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षांवर जिल्हाधिकारी यांचा आदेश असतानादेखील कारवाई करण्यासाठी टाळाटाळ हाेत असल्याचा आराेप केसरबाई गायकवाड यांनी केला आहे़ या प्रकरणी दाेषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे़
लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जनता एज्युकेशन सोसायटी या संस्थेस बनावट कागदपत्रांच्या आधारे नोव्हेंबर २०१९ मध्ये हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जा अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी मिळून आणला होता; परंतु हा अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावामध्ये बनावट कागदपत्र जोडलेली असल्याची तक्रार जनता एज्युकेशन सोसायटीचे मयत सदस्य नाना गायकवाड यांच्या पत्नी श्रीमती केसरबाई गायकवाड यांनी डिसेंबर २०१९ मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे याबाबतचा अहवाल पाठविला होता. त्या अहवालाची चौकशीस तडवी सक्षम प्राधिकारी तथा सहायक सचिव अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी केली. या प्रस्तावासोबत बनावट कागदपत्र जोडलेले असल्यामुळे १५ जानेवारी २०२० रोजी जनता एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेने अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला असल्याचे उघड झाल्याने त्यांनी अल्पसंख्याक विभागाचे प्रमाणपत्र तत्काळ या कार्यालयास परत करावे, असा आदेश पारित केला. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी १७ जून २०२१ रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दोषी व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश पारित केला होता; परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती लोणार यांच्याकडे हे प्रकरण चौकशीसाठी दिले. या प्रकरणात दाेषींवर अजूनही कारवाई झालेली नाही़
अल्पसंख्याक विभागानेदेखील बनावट कागदपत्र जोडल्याचे लेखी स्वरूपात कळविले आहे. त्यावर जिल्हाधिकारी यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पत्र देखील दिले आहे; परंतु माध्यमिक शिक्षण अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती लोणार हे या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे येत्या दोन ऑक्टोबर रोजी ते बेमुदत उपोषणास बसणार आहेत.
केसरबाई गायकवाड, अंजनी खुर्द.