आपत्ती काळातही ९७ मनोरुग्णांचा धैर्याने सांभाळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:32 AM2021-03-25T04:32:27+5:302021-03-25T04:32:27+5:30

सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाची झळ सर्वच क्षेत्रांना बसली. अशीच झळ तालुक्यातील ...

Take care of 97 mentally ill people even in times of disaster! | आपत्ती काळातही ९७ मनोरुग्णांचा धैर्याने सांभाळ !

आपत्ती काळातही ९७ मनोरुग्णांचा धैर्याने सांभाळ !

Next

सुधीर चेके पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाची झळ सर्वच क्षेत्रांना बसली. अशीच झळ तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील निराधार, बेवारस आणि मनोरुग्णांचा हक्काचा निवारा असलेल्या ‘सेवासंकल्प प्रतिष्ठान’लाही बसली हाेती. कोरोनामुळे धडधाकट माणसांच्या पोटापाण्याचा प्रश्न उद्भवलेला असताना केवळ दानशुरांच्या मदतीवर अवलंबून असलेल्या ‘सेवासंकल्प’तील ९७ मनोरुग्णांचा उदरनिर्वाह भागविण्याच्या दिव्यातून प्रतिष्ठानला जावे लागले असले तरी काही प्रमाणात ही आपत्ती प्रतिष्ठानसाठी इष्टापत्तीदेखील ठरली आहे.

समाजातील अनेक निराधार, बेवारस आणि मनोरुग्ण किंवा शरिराने जर्जर होऊन रस्त्यावर बेवारस असलेल्या गोरगरीब व्यक्तिंसाठी सेवासंकल्प प्रतिष्ठान हे हक्काचे घर उभे करून त्यांचा सांभाळ करण्याचे काम डॉ. नंदकिशोर व डॉ. आरती पालवे यांच्याकडून सुरु आहे. हा प्रकल्प पूर्णत: समाजातील दानशुरांच्या मदतीवर अवलंबून आहे. याठिकाणी सध्या ९७ मनोरुग्णांचा सांभाळ केला जात आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात सर्वांचेच अर्थचक्र बिघडल्याने प्रतिष्ठानला होणारी मदत काही प्रमाणात कमी झाल्याने प्रकल्पावरील रुग्णांचा उदरनिर्वाह मध्यंतरी बिकट बनला होता. या बिकट काळातही काही दानशुरांनी सढळ हाताने मदत केल्याने अन्नधान्य व किराण्याचा प्रश्न सुटू शकला.

प्रकल्पावरील मनोरुग्णांच्या पोटापाण्यासह त्यांच्या आरोग्याची योग्यतऱ्हेने देखभाल होत असताना प्रकल्पाला कोराेनाची बाधा होऊ न देणे ही मोठी जबाबदारी या काळात पालवे दाम्पत्याने लिलया पार पाडली. प्रकल्पावरील मनोरुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रकल्पाला भेट देण्यास इच्छुक विविध समाजसेवी संस्था व व्यक्तिंना नम्रपणे नकार देण्यात आला. तथापि, नवीन रुणांना प्रकल्पावर दाखल करून घेणेही थांबविण्यात आले होते. मात्र, अशा कठीण काळातही चार नवीन मनोरुग्ण महिलांची इतरत्र कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आले. मात्र, त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यासह खबरदारीचे सर्व उपाय काटेकोरपणे पाळण्यात येऊन प्रकल्पातील सर्वांचा सांभाळ या कठीण काळातही पालवे दाम्पत्याने मोठ्या धैर्याने व नेटाने पार पाडला. या प्रकल्पात आज ९७ मनोरुग्णांचा सांभाळ केला जात आहे.

Web Title: Take care of 97 mentally ill people even in times of disaster!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.