तूर विक्रीसाठी सातबारा व प्रतिक्विंटल चारशे रुपये घ्या !
By admin | Published: May 21, 2017 07:07 PM2017-05-21T19:07:47+5:302017-05-21T19:07:47+5:30
खामगाव : शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शासन ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटलने तुरीची नाफेडमार्फत हमीदराने खरेदी करीत आहे. मात्र काही व्यापारी भाव तफावतीचा गैरफायदा उचलत असून नफा मिळवित आहेत.
गिरीश राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : यावर्षी खुल्या बाजारात तुरीचे भाव अद्यापही ४ हजाराचे खालीच असताना शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शासन ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटलने तुरीची नाफेडमार्फत हमीदराने खरेदी करीत आहे. मात्र या भाव तफावतीचा गैरफायदा काही व्यापारी उचलत असून खुल्या बाजारातून ३६०० ते ३८०० रुपये प्रतिक्ंिवटल दराने तूर खरेदी करुन नाफेडला हमीदराने विकून प्रतिक्विंटलमागे १००० ते १२०० रुपये नफा मिळवित आहेत.
नाफेडच्या केंद्रावर व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. मात्र नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर तूर विकण्यास आणताना अगोदर सातबारा आवश्यक असतो. पेरेपत्रक आवश्यक असून पेरेपत्रकावर तुरीचा पेरा किती होता हे नमूद असणे आवश्यक आहे. सोबतच तूर विक्रीचे पैसे नगदी देण्यात येत नसून संबंधित सातबाऱ्यावर नमूद असलेल्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांचे आधारकार्डाची छायांकित प्रत सुध्दा घेण्यात येत आहे. एकूणच या केंद्रावर व्यापाऱ्यांनी तूर न विकता जो तुरीचे उत्पादन घेतो अशा शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता येईल. मात्र काही शेतकरी क्षुल्लक लालसेपोटी किंवा कोणाचे तरी भले होते या अनावश्यक भावनेच्या आहारी जावून आपला सातबारा, पेरेपत्रक, आधार कार्ड छायांकित प्रत व्यापाऱ्याला देतात व उलट व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केल्या जात असल्याचा आरोप करतात. आपल्या सातबाऱ्यांवर तूर विकून व्यापारी १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल असा शेकडो क्विंटलवर लाखोचा नफा कमवित असताना काही हुशार शेतकरी फुकटात सातबारा देण्यास तयार नसतात अशा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून ४०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे रक्कम देण्यात येत आहे. तर काही शेतकरी व्यापाऱ्यांच्या गप्पांची भुरळ पडल्याने काहीही मोबदला न घेता आपला सातबारा व इतर कागदपत्र व्यापाऱ्याच्या हवाली करुन चुकाऱ्यांच्या आपल्या खात्यात जमा झालेली रकमेचा धनादेश किंवा खात्यात जमा झालेल्या रकमेचा विड्रॉल केवळ चहाच्या मोबदल्यात देत आहेत. एकूणच यामुळेच गैरप्रकारांना पाठबळ मिळत आहे.
शेतकऱ्यांची कृती "कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ"
शासन शेतकऱ्यांसाठी हमीदराची योजना राबवित असताना यावर्षी भाव नसल्याने या केंद्रावर तुरीची आवक वाढून तारांबळ उडत आहे. मात्र संकट म्हणजे संधी असे समजत व्यापाऱ्यांकडून याच हमीदर केंद्रावर शेकडो क्विंटल तूर विकल्या जात आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या या केंद्रावर व्यापाऱ्यांची तूर आधी मोजल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. मात्र व्यापारी हे शेतकऱ्यांच्याच सातबाऱ्यावर तूर विकत आहेत. तेव्हा व्यापाऱ्यांना सातबारा देणाऱ्या शेतकऱ्यांची ही कृती म्हणजे "कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ" अशीच म्हणावी लागेल.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्थान नाही
नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर नंबरप्रमाणे तूरीचे मोजमाप होत आहे. अत्यल्प तुरीचे मोजमापाला प्राधान्य देण्याची आवश्यकता असताना किंवा वेगळा वजनकाटा ठेवण्याची गरज असताना तशी कोणतीही सुविधा या केंद्रावर नाही. त्यामुळे अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाच्या या शेतमाल हमीदर योजनेचा कोणताही फायदा नाही. आधीच अत्यल्प उत्पादन त्यात महिनाभर तुरीचे मोजमापाची प्रतिक्षा, तुरीची रखवालदारी व महिनाभराने चुकारा यामुळे ५ ते १० क्विंटल तूर उत्पादन झालेल्या शेतकऱ्यांना नाईलाजाने आपली तूर कमी भावात खुल्या बाजारात व्यापाऱ्यांना विकावी लागली. व्यापाऱ्यांनी हीच तूर खरेदी करुन शेतकऱ्यांच्या नावे नाफेडला हमीभावाने विकली. तेव्हा अल्प उत्पादन असलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीचे प्राधान्याने मोजमापाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.