शेजाऱ्याकडून वीज घेतली तर दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:41 AM2021-09-07T04:41:16+5:302021-09-07T04:41:16+5:30
जिल्ह्यात वीज चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ग्रामीण भागात तर सर्रासपणे आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे. शहरांमधील ग्राहक ...
जिल्ह्यात वीज चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ग्रामीण भागात तर सर्रासपणे आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे. शहरांमधील ग्राहक वीज तारांवर आकडे टाकत नसून, मीटरमध्येच छेडछाड करीत वीजचोरी करीत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. तसेच काही लोक घरगुती कनेक्शनवर व्यवसाय करतात. काहीजण शेजाऱ्यांना वीज देत असल्याचे दिसून येते. हा प्रकार किरकोळ वाटत असला तरी, महावितरणच्या नियमानुसार गुन्हा आहे. अनेकजण शेजाऱ्यांना विजेची विक्री करतात. ग्राहकांवर फौजदारी गुन्हा अथवा दंड वसुलीची कारवाई होऊ शकते. वीजचोरी करू नये, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कारवाई सुरू
जिल्ह्यात महावितरणच्यावतीने वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध तसेच शेजाऱ्याला वीज देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीजचोरी पकडून वीजचोरी करणाऱ्यांवर कलम १३५ व १२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वीजचोरी दाखविणाऱ्यांना बक्षीस देणे बंद
पूर्वी जी व्यक्ती वीज चोरीबाबत महावितरणला माहिती देत होती, त्याला महावितरणकडून बक्षीस दिले जात होते; परंतु आता ही सुविधा बंद झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
कलम १३५ व १२६ अंतर्गत होऊ शकतो गुन्हा दाखल
वीज विक्री करण्याचा अधिकार हा महावितरण व त्याला संलग्नित असलेल्या वितरण कंपनीलाच आहे.
इतरांना वीज दिल्याचे निदर्शनास आल्यावर विद्युत अधिनियमाप्रमाणे फौजदारी कारवाई होऊ शकते.
तसेच वीजचोरी झाल्याचे समजल्यास वीज कनेक्शन घेतल्यापासून सर्व रक्कम वसूल केली जाऊ शकते.
वीजचोरी करणारे व शेजाऱ्याला वीज देणाऱ्यांवर कलम १३५ व १२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो.
शेजाऱ्याला वीजपुरवठा देणे गुन्हा आहे. अशी वीज दिल्याचे निदर्शनास आल्यावर कारवाई केली जाते. सध्या कंझरा व कोलोरी भागात कारवाई सुरू आहे. वीज ग्राहकांनी त्यांच्याकडे थकीत असलेले वीज सबिल भरावे व वीज चोरी करू नये.
- बी. पी. बक्षी, उपकार्यकारी अभियंता,महावितरण, खामगाव.