कोरोनाच्या नावाखाली तलाठ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:44 AM2020-08-25T11:44:01+5:302020-08-25T11:44:29+5:30
काही गावांमध्येच तलाठ्यांनी खासगी व्यक्तींची नेमणूक केली असून, दाखले व इतर महत्वाचे कागदपत्र देण्याचे काम करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अनेक गावांमध्ये तलाठी फिरकतच नसल्याचे चित्र आहे. मंडळ कार्यालयात बसूनच मुख्यालयाचा कारभार करण्यात येत आहे. काही गावांमध्येच तलाठ्यांनी खासगी व्यक्तींची नेमणूक केली असून, दाखले व इतर महत्वाचे कागदपत्र देण्याचे काम करत आहेत.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी मुख्यालयाला भेट देणे अपेक्षीत आहे. मात्र, गत काही दिवसांपासून कोरोनाच्या नावाखाली अनेक तलाठी नेमुन दिलेल्या गावांमध्ये फिरकतच नसल्याचे चित्र आहे. तलाठ्यांनी आठवडी बाजार असलेल्या गावात कार्यालये घेतली आहेत. या गावातूनच तलाठी कारभार हाकत असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, परिसर सील करणे, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे व तसेच विद्यार्थी व शेतकऱ्यांना वेळेवर गावातच दाखले मिळावे, यासाठी तलाठ्यांनी नेमुन दिलेल्या गावात भेट देणे अपेक्षीत आहे. मात्र, अनेक गावांमध्ये विशेषत: दुर्गम भागात तलाठी फिरकतच नसल्याचे चित्र आहे. सध्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी विविध दाखल्यांची गरज आहे. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना तलाठ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. अनेक गावांमध्ये खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. तेच ग्रामस्थांना कागदपत्रे वितरण करण्याचे काम करीत असल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देउन तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्याची मागणी होते.
खासगी व्यक्तींची नियुक्ती
धामणगाव धाडसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तलाठ्यांनी खासगी व्यक्तीची नियुक्ती केली आहे. तलाठी कार्यालय बंद राहत असल्याने ढालसांवगी, सोयगांव, पांगरखेड, वरूड धामणगांवसह धाड भाग दोन मधील शेतकरी व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. महीला कर्मचारी सुटीवर एकाच तलाठ्यावर कामाचा ताण वाढला आहे. खासगी व्यक्तीच गावातील कारभार पाहत असल्याचे चित्र आहे. अनेक तलाठ्यांकडे चार ते पाच गावांचा प्रभार दिलेले आहे. त्यामुळे, तलाठी यापैकी एकाही गावात जात नसल्याचे चित्र आहे.