उद्दिष्ट १५०० कोटींचे, वाटप केवळ ४५० कोटी; कर्जवाटप संथगतीने; शेतकऱ्यांचे होतात हाल

By विवेक चांदुरकर | Published: June 17, 2024 06:15 PM2024-06-17T18:15:48+5:302024-06-17T18:16:27+5:30

३० जूनपूर्वी पुनर्गठन केल्यास शून्य टक्के व्याज

Target 1500 crores, allocation only 450 crores; Loan disbursements are slow; Farmers suffer | उद्दिष्ट १५०० कोटींचे, वाटप केवळ ४५० कोटी; कर्जवाटप संथगतीने; शेतकऱ्यांचे होतात हाल

उद्दिष्ट १५०० कोटींचे, वाटप केवळ ४५० कोटी; कर्जवाटप संथगतीने; शेतकऱ्यांचे होतात हाल

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि. बुलढाणा: जिल्ह्यात शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाकरिता १,५०० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, १७ जूनपर्यंत केवळ ३० टक्के ४५० कोटींचेच वाटप करण्यात आले आहे. पीककर्जाचे वाटप संथगतीने सुरू असून, शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे.

खरीप हंगामात पेरणी करण्याकरिता शेतकऱ्यांंना बँकांच्या वतीने एक वर्ष मुदतीपर्यंत बिनव्याजी पीककर्ज देण्यात येते. अनेक शेतकरी बॅंकांकडून पीककर्ज घेऊन पेरणी करतात. मात्र बँकांच्या वतीने शेतकऱ्यांंना विनाकारण कागदपत्रांची मागणी करण्यात येते. तसेच त्रास देण्यात येतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

जिल्ह्याला १,५०० कोटी रुपयांचा पीक कर्ज आराखडा मंजूर झाला आहे. यात आतापर्यंत ३० टक्के म्हणजेच सुमारे ४५० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विनासायास कर्जपुरवठा व्हावा, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये अर्ज करावा.

शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतलेले असल्यास पीक कर्जाची परतफेड ३० जूनपूर्वी करणे आवश्यक आहे. ३० जूनपूर्वी कर्जाची परतफेड झाल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ होणार असून शून्य टक्के व्याजदर लागणार आहे. तसेच कर्जाचे पुनर्गठन केल्यासही शून्य टक्के व्याजाने आकारणी होणार आहे.  
  
येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यातून मुबलक प्रमाणात कर्ज पुरवठा होणार आहे. शेतकऱ्यांनी पुढे येऊन पीक कर्ज घ्यावे, तसेच शून्य टक्के व्याज दराचा लाभ घेण्यासाठी जुन्या पीक कर्जाचे ३० जून पूर्वी पुनर्गठन करायला हवे.
- डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी

Web Title: Target 1500 crores, allocation only 450 crores; Loan disbursements are slow; Farmers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.