बंदी असतानाही रात्री मोजली तूर!
By admin | Published: June 15, 2017 12:17 AM2017-06-15T00:17:53+5:302017-06-15T00:17:53+5:30
‘स्वाभिमानी’ची तक्रार : जिल्हाधिकारी यांचे चौकशीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : नाफेड केंद्रावर विना टोकनचे सुमारे २०० पोते तूर मोजमाप होत असल्याचा प्रकार गत महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघड केला होता, तर त्या पोत्यापैकी मोजमाप झालेले २९ क्ंिवटल तूर जप्त करण्यात आली होती; परंतु तूर खरेदी बंदचे आदेश असताना १० जूनच्या रात्री उशिरा तूर मोजण्यात आली, असा आरोप करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष दीपक सुरडकर यांनी १३ जून रोजी केली आहे.
स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी विना टोकन मोजमाप होत असलेली सुमारे २०० पोते तूर पकडली होती. याची चौकशी होऊन पंचनामा झाला होता व मोजमाप झालेली २९ क्विंटल तूर जप्त करून वेअर हाऊसला साठवण्यात आले. व्यवस्थापकांनी सदर पोते कुणाचे आहे, याची इनकॅमेरा कबुली दिलेली असून, बाजार समितीकडे याची नोंद नसल्याचे जिल्हा पणन व्यवस्थापक यांच्या समक्ष निदर्शनास आले होते; परंतु आता उर्वरित पोत्यांना एक महिना कालावधी उलटल्यानंतर अचानकपणे नवीन वाली तयार झाला कसा? एकीकडे तूर खरेदी बंदचे आदेश असल्याने शेतकऱ्यांची सुमारे ८० हजार क्विंटल तुरीची नोंद चिखली बाजार समितीकडे झालेली आहे व ती तूर आजही शेतकऱ्यांच्या घरी पडून असताना खरेदी बंद करण्यात आली आहे, तर दुसरीकडे १० जूनच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास रविवारी कुठलाही ग्रेडर, मापारी, बाजार समिती कर्मचारी, नसताना मोजमाप झाले कसे? असा प्रश्न या तक्रारीतून करून तूर खरेदीचा काळाबाजार होत असल्याचा आरोपही केला आहे, तर सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी उर्वरित तूर पोते मोजायला सांगितले असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले आहे; परंतु या उर्वरित पोत्यांचे व्यवस्थापक यांच्या सांगण्यानुसार नेमका पोत्याचा खरा मालक कोन? बंदचे आदेश असताना रात्री ९ वाजता पोते मोजले कसे? असे प्रश्न उपस्थित करून विना टोकन तूर मोजल्याप्रकरणी व रात्रीच्या वेळी नियमबाह्य तूर खरेदी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी व झालेल्या मोजमापाची नोंद करण्यात येऊ नये, तसेच पोते जप्त करण्यात येऊन याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक सुरडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे १३ जून रोजी केली आहे. या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांनी याबाबत तातडीने चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना दिले आहेत. यावेळी राणा चंदन, नितीन राजपूत, अनिल चौहान, विलास तायडे, भरत जोगदंडे उपस्थित होते.