मराठी मातीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 08:06 PM2024-03-20T20:06:36+5:302024-03-20T20:08:18+5:30

मेहकरमधील सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या लढाईचे रणशिंग फुंकले.

Teach a lesson to those who betray Marathi soil Uddhav Thackerays appeal | मराठी मातीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

मराठी मातीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

दत्ता उमाळे, मेहकर: "मराठी मातीशी गद्दारी करणाऱ्यांना शिवरायांनी धडा शिकवला, त्याच प्रमाणे या मातीशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. माँसाहेब जिजाऊंनी ज्या प्रमाणे तेजस्वी रत्न महाराष्ट्राला दिले आणि या रत्नाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच प्रमाणे धनशक्तीविरोधातील जनशक्तीच्या या लढ्यात आम्हा सगळ्या मावळ्यांना निर्विवाद यश दे, असे साकडेच आपण मातृतिर्थात माँसाहेब जिजाऊंसमोर घातले आहे," असं म्हणत मेहकरमधील सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या लढाईचे रणशिंग फुंकले.

शिवसेनेतील अभूतपूर्व असे बंड झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांची ही शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या होमग्राऊंडवरील ही पहिलीच सभा होती. त्यामुळे उद्धव ठाकरे येथे काय बोलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. नगर पालिकेच्या स्वातंत्र्य मैदानावर झोलल्या या सभेस खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत उपस्थित होते.

दरम्यान, आज केंद्र व राज्य सरकार महाराष्ट्राला लुटत आहे. त्यामुळे उपस्थितांना ‘तुम्हाला महाराष्ट्र लुटणारे हवेत की महाराष्ट्र राखणारे सोबत हवेत’, असा प्रश्न विचारत एक भावनिक आवाहन करत निष्ठावंतांना साथ देत सोबत राहावे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. "धनशक्ती विरोधातील जनशक्तीच्या या संघर्षामध्ये निश्चितच यश मिळेल, असे आश्वस्त करत सध्याचा काळ हा कसोटीचा काळ आहे. माझ्या व आपल्या पाठीत यांनी वार केले. स्व. दिलीप रहाटे यांनी येथे शिवसेनेची बीजे रोवली. त्याचा महावृक्ष झाला. त्याची फळे हे खात आहेत. आता त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. कडवट शिवसैनिक हा मॅच जिंकून देणारा आहे. आपणही बाजूला राहून गंमत पाहाणारे नाही. मॅच खेळून जिंकणारे आहोत," असेही ठाकरे म्हणाले.

दरम्यान, यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर आणि जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांचीही भाषणे झाली.

Web Title: Teach a lesson to those who betray Marathi soil Uddhav Thackerays appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.