काेराेनाविषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक दिमतीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:33 AM2021-05-17T04:33:16+5:302021-05-17T04:33:16+5:30
ओमप्रकाश देवकर, मेहकर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना करून त्याच्या अंमलबजावणीचे काम सुरू केले आहे. ...
ओमप्रकाश देवकर, मेहकर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना करून त्याच्या अंमलबजावणीचे काम सुरू केले आहे. याकरिता जिल्हा परिषद शिक्षकांच्या या कामी नेमणुका केल्या आहेत. मात्र, पोलिसांच्या मदतीला तसेच लसीकरण व ग्रामस्तरीय समितीमध्ये नेमणूक झालेल्या शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने शिक्षकांची दमछाक होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे.
जिल्ह्यासह मेहकर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. याकरिता गावस्तरीय समिती तयार करून या समितीमध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, पोलीसपाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदींची नेमणूक केली आहे. यामध्ये इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार यांच्या आदेशाने मेहकर पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्यांच्या मदतीला शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. हे शिक्षक मेहकर पोलिसांना सहकार्य करत आहेत. याशिवाय ग्रामस्तरीय समितीमध्ये शिक्षकांच्या नेमणुका केल्या असून, त्यांच्याकडे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयसोलेशन कक्ष तयार करणे, घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणे, त्याची नोंद करणे, कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना पुढील तपासणीसाठी आरोग्य केंद्राकडे पाठवणे यासारखी कामे त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. त्याप्रमाणे ते काम करत आहेत. मात्र, असे असतानाही या शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, शिक्षकांना पेट्रोल घेण्यास अडचणीचे जात आहेत. पेट्रोल पंप चालकांकडून त्यांना नियुक्तीचा आदेश दाखवा, अशी मागणी होत आहे. यामुळे इन्सिडेंट कमांडर यांच्याकडून या शिक्षकांना अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
अनेकांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने ग्राम पातळीवर काम करत असलेल्या शिक्षकांना अशाप्रकारे तोंड द्यावे लागत असेल तर या बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव
ग्रामस्तरीय समितीमध्ये नेमणूक असलेला एक शिक्षक आपले काम आटोपून घरी परतत असताना पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्यावर कार्यवाही केली. संबंधित शिक्षकाने अनेकवेळा सांगितले की, मी प्रशासनाच्या आदेशानुसार कामावर गेलो होतो. तरीही त्या शिक्षकावर कारवाई करण्यात आली. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावरुन प्रशासनामध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.