शिक्षकांनी स्वखर्चातून राबविला आरोग्यदायी ‘वाटर बेल’ उपक्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 02:41 PM2020-03-01T14:41:15+5:302020-03-01T14:41:26+5:30
वझर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेत स्वखर्चातून ‘वॉटर बेल’ उपक्रम सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले की विविध आजार उद्भवतात. अनेक शालेय विद्यार्थी शाळेत पाणी पित नाहीत. त्यामुळे त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत, वझर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेत स्वखर्चातून ‘वॉटर बेल’ उपक्रम सुरू केला आहे. शिक्षकांच्या दातृत्वामुळे २२६ विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे.
खामगाव येथून जवळच असलेल्या दुर्गम भागातील वझर येथे जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेला काही दिवसांपूर्वीच आयएसओ दर्जा मिळाला आहे. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्याना पुरेशे पाणी पिण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलास वानखेडे, शिक्षिका ठाकूर, शिक्षक टाक, परिहार, बाहेती, मुरकुटे आणि राऊत यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना वॉटरबॅग उपलब्ध करून दिल्यात. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना वॉटर बॅग आणि इतर साहित्य उपलब्ध झाल्यानंतर शाळेत वॉटरबेल उपक्रमाला सुरूवात करण्यात आला. वझर येथील आयएसओ मानांकन प्राप्त शाळेचे अनुकरण तालुक्यातील इतरही शाळा करीत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून वझर येथील शिक्षकांनी एक प्रकारे समाजासमोर नवीन आदर्शच निर्माण केल्याची चर्चा परिसरात होत आहे.
सौर उर्जायंत्रावर बेल
वझर येथील विद्यार्थ्यांची आर्थिक दुर्बलता लक्षा घेता, शिक्षकांनी शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम साकार करण्यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमासाठी शाळेतील सर्वच शिक्षकांनी मदत केली. या वॉटर बेल उपक्रमाच्या माध्यमातून आयएसओ मानांकित वझर येथील जिल्हा परिषद शाळेत तीन वेळा बेल वाजविली जाते. बेल वाजताच विद्यार्थी पाणी पिण्यास सुरूवात करतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जपणूक करण्यास मदत होणार आहे. तीनवेळा बेल वाजविण्यासाठी शाळेत सौर उर्जायंत्रावर बेल बसविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी वॉटर बेल उपक्रम फलदायी ठरणार आहे.