खासगी क्लासेस लावण्यासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:35 PM2018-07-07T17:35:39+5:302018-07-07T17:36:43+5:30
बुलडाणा : शासनाचा पगार घेणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्वता:च्या खासगी क्लासेस लावण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या माध्यमातून खाजगी क्लासेसची कोट्यवधीची उलाढाल होत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : शासनाचा पगार घेणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्वता:च्या खासगी क्लासेस लावण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या माध्यमातून खाजगी क्लासेसची कोट्यवधीची उलाढाल होत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील गरीब, हुशार विद्यार्थ्यांची होरपळ होत आहे.
स्पर्धेचे युग असल्यामुळे सर्वत्र यश मिळविण्याठी स्पर्धा तीव्र होत आहे. अनेक पालकांना आपला पाल्य डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावा, असे वाटते. यासाठी वार्षिक तसेच सीईटी, निट, जेईई आदी परीक्षेत चांगले गुण आवश्यक असतात. यासाठी खाजगी कोचिंग क्लासेसचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी नोकरी न करता खाजगी क्लासेस सुरू केले आहेत. याठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी वाढत असल्यामुळे अनेक शिक्षकांचे शाळेत शिकविणे कमी झाले आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी कोंचिग क्लासेसला न जावू देता शाळेतील शिक्षकांकडे कोचिंग घेण्यासाठी बाध्य करण्यात येत आहे. शाळेतील शिक्षक अशा विद्यार्थ्यांना आपल्या घरी किंवा शाळा परिसरात असलेल्या कथितस्तरावरील अवैध कोंचिग क्लासेसमध्ये येण्यासाठी दबाब आणतात, असा आरोप रयत क्रांती संघटनेने केला आहे.
रयत क्रांती संघटनेचे निवेदन
शासकीय किंवा अनुदानित शाळा, महाविद्यालयावर पगार घेवून अतिरिक्त उत्पन्नाच्या लालसेपाटी बुलडाणा शहरात अनेक शिक्षक गोरगरीब विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसा उकळून खाजगी शिकवणी वर्ग घेत आहेत. शासनाचा पगार घेवून खाजगी शिकवणी वर्ग घेणे ही कायदेशीर चुकीची बाब असल्यामुळे संबंधित शिक्षकांवर आपल्यास्तरावरून कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोनु चव्हाण, युवा प्रदेश उपाध्यक्ष संदीप मुळे, आशिष लहासे, तुषार काचकुरे आदींनी केली आहे.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालयास शिक्षणविभागातर्फे पत्र पाठवून खाजगी क्लासेस न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र ज्या ठिकाणी शाळेतील शिक्षक अवैध कोचिंग क्लासेस घेताना दिसून येतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक, बुलडाणा.