संचमान्यतेत अडकली पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती, १५ मे पर्यंत अंतिम संचमान्यता करण्याचे शिक्षण विभागाचे नियाेजन
By संदीप वानखेडे | Published: May 7, 2023 05:05 PM2023-05-07T17:05:04+5:302023-05-07T17:06:11+5:30
आता शिक्षण विभागाने १५ मे पर्यंत शाळांच्या संच मान्यता अंतिम करण्याचे नियाेजन केले आहे.
बुलढाणा : राज्यभरात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली़. त्याचा निकालही जाहीर करण्यात आला. मात्र, संचमान्यताच झाली नसल्याचे ही भरती रखडल्याचे चित्र आहे. आता शिक्षण विभागाने १५ मे पर्यंत शाळांच्या संच मान्यता अंतिम करण्याचे नियाेजन केले आहे.
गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीच झाली नसल्याने जिल्हा परिषदांसह खासगी शाळांमध्ये माेठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. दुसरीकडे डीएड, बीएड झालेले लाखाे भावी शिक्षक बेराेजगार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर राज्य शासनाने शिक्षक भरती प्रक्रियेला गती दिली आहे. शाळांमधील बाेगस विद्यार्थी शाेधण्यासाठी आधार वैध संख्येवर संच मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याची प्रक्रिया शाळांमध्ये सुरू आहे. सद्यस्थितीत आधार वैध विद्यार्थी संख्येवर आधारित अंतरिम संच मान्यता करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या शाळांची आधार वैधतेची कार्यवाही पूर्ण झालेली नाही, अशा शाळांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतरिम करण्यात आलेल्या संच मान्यता १५ मे २०२३ पर्यंत अंतिम करण्याचे शिक्षण विभागाचे नियाेजन आहे.
जुलैपर्यंत पाेर्टलवर येणार रिक्त पदांची माहिती
संच मान्यता अंतिम करून संच मान्यतेचे शाळानिहाय वितरण २० मे २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. संच मान्यता अंतिम झाल्यानंतर व्यवस्थापनाकडून बिंदू नामावली ३० जून २०२३ पर्यंत प्रमाणीत करण्यात येणार आहे. त्यानंतर पहिल्या तिमाहीकरिता १५ जुलैपर्यंत शिक्षकांच्या रिक्त पदे पाेर्टलवर येणार आहेत.