शिक्षकांच्या बदल्या अवघड क्षेत्रात

By Admin | Published: May 14, 2017 02:30 AM2017-05-14T02:30:18+5:302017-05-14T02:30:18+5:30

येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन बदली धोरण जाहीर : विविध शिक्षक संघटनांचा विरोध

Teacher transfers in difficult areas | शिक्षकांच्या बदल्या अवघड क्षेत्रात

शिक्षकांच्या बदल्या अवघड क्षेत्रात

googlenewsNext

हर्षनंदन वाघ
बुलडाणा : जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संवर्गासाठी जिल्ह्यांतर्गत बदलीसाठीचे नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सोईच्या ठिकाणी नोकरी करणार्‍या शिक्षकांना अवघड क्षेत्रात पाठविण्यात येणार आहे.
अनेक शाळांमध्ये दहा - दहा वर्षांपासून शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांच्या बदलीसाठी आता अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष, बदली निश्‍चित धरावयाची सलग सेवा आदीच्या अनुषंगाने निकष निर्धारित करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ९0 टक्के शिक्षकांच्या बदल्या येत्या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहेत. मात्र, याबाबतचा शासनाचा आदेश संदिग्ध असल्याचा आरोप करून विविध शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे.
शिक्षक बदली धोरण निश्‍चित करताना एकूण पाच प्रकारे बदल्या होणार आहेत. त्यात सर्वसाधारण क्षेत्र, विशेष संवर्ग भाग-१, विशेष संवर्ग भाग-२, अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त शिक्षक व विनंती बदल्यांचा समावेश राहणार आहे. अवघड क्षेत्रात बदलीसाठी तीन वर्षे सलग सेवा कालावधी निश्‍चित धरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र जाहीर करण्यात येणार असून, त्यानुसार दोन्ही क्षेत्रातील शाळांच्या याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून शाळानिहाय रिक्त ठेवावयाच्या शाळांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. रिक्त ठेवायच्या जागी बदलीने नियुक्ती देता येणार नाही. शिक्षणाधिकार्‍यांनी बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर करायच्या आहेत. याद्यांमधील चुकीबाबत सात दिवसांत अर्ज करायचा असून, पुढील सात दिवसांत शिक्षणाधिकार्‍यांनी त्यावर निर्णय घ्यावयाचा आहे.
बदलीला पात्र असलेल्या शिक्षकांकडून २0 शाळांच्या नावांचा पसंतीक्रम घेण्यात येणार आहे. बदलीला पात्र शिक्षकांची बदली होणारच, असे बंधनकारक नाही. पसंतीक्रमानुसार बदली होत असल्यास तशी द्यावी किंवा बदली होणे बंधनकारक नसेल, तरीही पसंतीक्रमानुसार विनंतीने बदली देण्याचा विनंती अर्ज घेऊन कार्यवाही करता येणार आहे. विशेष संवर्गात येणार्‍या शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा यादीत नाव असताना बदली नको असल्यास त्यांना विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे अर्ज करावा लागणार आहे. तसेच टप्पा एकनुसार आकृतीबंधानुसार एखाद्या शाळेत रिक्त ठेवायच्या शिक्षक पदांपेक्षा कमी पदे रिक्त असतील, तर तेथील जास्तीच्या शिक्षकांची बदली करण्यात येणार आहे. बदली करताना सेवाज्येष्ठतेचा निकष असणार आहे. टप्पा दोननुसार विशेष संवर्गातील शिक्षकांना त्यांच्या विनंतीनुसारच बदली देण्यात येणार आहे. टप्पा एक व दोन झाल्यानंतर विशेष संवर्ग भाग दोनमधील शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. विनंती बदलीस पात्र शिक्षकांसाठी तीन वर्षांची सेवा बंधनकारक राहणार आहे. तसेच बदलीपात्र शिक्षकांच्या करायच्या बदल्यांबाबतही ज्येष्ठता यादी, पसंतीक्रम, रिक्त पदे यांचा विचार करूनच कार्यवाही करायची आहे. बदली आदेश निर्गमित करताना कार्यमुक्तीचा आदेशही द्यावयाचा आहे. त्यानंतर त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणावरून कोणतेही वेतन अदा करू नये, असे धोरण निश्‍चित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ५ हजार ८५0 शिक्षकांच्या बदल्या होणार!
जिल्हा परिषद अंतर्गत आजरोजी उर्दू व मराठी माध्यमाचे एकूण ६ हजार ५00 शिक्षक कार्यरत आहेत. जवळपास ९0 टक्के शिक्षक २00५ पूर्वी रूजू झाले असून, तेव्हापासून एकाच शाळेवर कार्यरत आहेत. त्यामुळे शासनाच्या नवीन आदेशान्वये ५ हजार ८५0 शिक्षक बदलीस पात्र ठरणार आहेत. मात्र, नवीन आदेशात बदलीस पात्र पूर्ण ५ हजार ८५0 शिक्षकांची बदली होणार किंवा नाही, याबाबत विसंगती दिसून येत आहे. सदर बदल्या खो-खो खेळासारख्या होणार आहेत. यादीतील सेवाज्येष्ठ शिक्षक आपल्यापेक्षा कनिष्ठ शिक्षकांना खो देणार आहेत. नेमका कोणाला खो देणार आहे, हे शासन निर्णयात निश्‍चित नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

बदल्यासंदर्भात शासनाचा निर्णय विसंगत आहे. चार महिन्यांपूर्वी विषय शिक्षक, मुख्याध्यापक झालेल्या शिक्षकांच्या बदल्या सलग सेवाज्येष्ठता धरण्यात आल्यामुळे पुन्हा होणार आहेत. त्यामुळे सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या बदल्या दरवर्षी होणारा हा अन्यायकारक निर्णय रद्द न झाल्यास विविध संघटनांना न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.
-रवींद्र नादरकर, जिल्हा सरचिटणीस, पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटना, बुलडाणा.

Web Title: Teacher transfers in difficult areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.