ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक बदल्यांचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 05:34 PM2019-02-09T17:34:08+5:302019-02-09T17:34:13+5:30
बुलडाणा: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून बदलीपात्र शिक्षकांना यादीची प्रतीक्षा लागली आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक बदल्यांचे सत्र सुरू करण्यात आल्याने याचा परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून बदलीपात्र शिक्षकांना यादीची प्रतीक्षा लागली आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक बदल्यांचे सत्र सुरू करण्यात आल्याने याचा परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत हजारो शिक्षकांच्या आॅनलाइन पद्धतीने बदल्या झाल्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील शिक्षकांना स्व जिल्ह्यात येण्याची संधी मिळाली आहे. अनेक वर्ष बाहेरील जिल्ह्यात सेवा केल्यानंतर स्व जिल्ह्यात आल्याचा आनंद या शिक्षकांमध्ये पाहावयास मिळतो. यामध्ये काही शिक्षकांच्या इच्छेनुसार बदल्या झाल्या आहेत. शिक्षकांची ही सर्व बदली प्रक्रिया दिवाळी सुट्टी किंवा उन्हाळी सुट्टीमध्ये पूर्ण करण्याच्या सुचना आहेत. शैक्षणिक सत्रामध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया ही शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधी राबविणे आवश्यक असते. मात्र आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आलेल्या असतानाच शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया हाती घेतली आहे. २१ फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान बारावीची परीक्षा होत आहे. तर १ मार्च ते २२ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये प्रत्येक शाळेत वार्षिक परीक्षांचे नियोजन करण्यात येते. अशाप्रकारे फेब्रुवारी ते मेपर्यंतचा कालावधी परीक्षांमध्येच जातो; मात्र याच कालावधीत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षेसह विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
पहिला दिवस ‘वेटींग’वरच
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांची यादी ९ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनला उपलब्ध होणार होती. मात्र शनिवारी उशिरापर्यंत यासंदर्भातची यादी उपलब्ध झाली नसल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. मात्र बदली प्रक्रियेचा पहिला दिवस ‘वेटींग’वरच गेल्याचे दिसून येते.
बदलीनंतर स्पष्ट होणार भरतीच्या जागा
सध्या शिक्षक भरतीचे वेध लागले आहेत. भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर सर्व माहितीही भरण्यात आलेली आहे. मात्र जिल्ह्यात किती जागांसाठी भरती होणार आहे, हे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची निश्चित संख्या अद्यापही गुलदस्त्यात आहे.
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आॅनलाइन होत असून अद्यापपर्यंत त्याची यादी उपलब्ध झाली नाही. या बदली प्रक्रियेनंतरच शिक्षक भरतीच्या जागाही समोर येतील.
- अनिल आकाळ,
उप शिक्षणाधिकारी, बुलडाणा.