संचमान्यता रखडल्याने शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 11:52 AM2021-08-12T11:52:27+5:302021-08-12T11:52:32+5:30

Khamgaon News : शाळा बंद असल्यामुळे जिल्ह्यात दोन वर्षांपासून संचमान्यताही झाली नाही.

Teachers await promotion in Khamgaon | संचमान्यता रखडल्याने शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा

संचमान्यता रखडल्याने शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा

Next

- विवेक चांदूरकर 
लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून, गत दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे जिल्ह्यात दोन वर्षांपासून संचमान्यताही झाली नाही. त्यामुळे शिक्षकांची पदोन्नतीही रखडली आहे.
दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी असलेल्या शाळेच्या पटसंख्येनुसार संचमान्यता होते. शाळेत पटावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळेत  किती शिक्षकांची गरज आहे, हे ठरविण्यात येते. यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी कमी आहेत, तेथील शिक्षक अतिरिक्त ठरतात; तर ज्या शाळेत पटावरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, त्या शाळेत शिक्षकांची बदली करण्यात येते. 
तसेच काही शिक्षक सेवानिवृत्त होतात किंवा अन्य कारणांमुळे जागा रिक्त होतात. गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण शाळा बंद होत्या. त्यामुळे संचमान्यता झाली नाही.  
त्यामुळे शिक्षक समायोजनाचा प्रश्न कायम असून, अनेकांना पदोन्नतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच संचमान्यता झाली नसल्यामुळे शाळांमधील शिक्षक संख्या तसेच अतिरिक्त शिक्षकांचे गणित सध्या बिघडले आहे. 
एकीकडे अतिरिक्त शिक्षक, तर दुसरीकडे रिक्त पदे असे काहीसे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. या वर्षी अद्याप पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत.  पुढील महिन्यातही शाळा सुरू होण्याबाबत निश्चिती नाही. 
त्यामुळे या वर्षीही संचमान्यता होईल की नाही, याबाबत संभ्रम आहे. परिणामी शिक्षकांमधील चिंता वाढली आहे.

गत दोन वर्षांपासून संचमान्यता झाली नाही. ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार संचमान्यता करून शिक्षक निर्धारण करण्यात येते. मात्र गतवर्षी कोरोना आजारामुळे शाळा भरलीच नाही. त्यामुळे संचमान्यता झाली नाही. 
- गजानन गायकवाड
गटशिक्षणाधिकारी, 
पंचायत समिती, खामगाव


गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात संच मान्यता झाली नाही. त्यामुळे पदोन्नती व शिक्षक निर्धारण प्रक्रिया रखडली आहे. शासनाने लवकरात लवकर संचमान्यता करायला हवी. यामुळे शिक्षक निर्धारण होईल व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
- विठ्ठल पाटेखेडे,
शिक्षक सेना, बुलडाणा.

Web Title: Teachers await promotion in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.