शिक्षक नवे, गणेवश जुनाच; अनुदान मिळूनही गणवेशाचा तिढा सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 05:54 PM2018-07-20T17:54:53+5:302018-07-20T17:55:53+5:30
बुलडाणा : शिक्षक बदल्यांमुळे मुख्यध्यापक व शाळा समितीचे संयुक्त बँक खाते काढण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : शिक्षक बदल्यांमुळे मुख्यध्यापक व शाळा समितीचे संयुक्त बँक खाते काढण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अनुदान पंचायत समिती स्तरावर येऊनही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणेवेशाचा तिढा अद्याप सुटला नाही. परिणामी, ज्या शाळेवर नविन शिक्षक आले, त्याठिकाणी विद्यार्थ्यांना मात्र जुन्याच गणवेशावर यावे लागत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत गणवेश वाटप करण्यात येतो. यावर्षी तर गणवेशाच्या अनुदानात वाढही करण्यात आली; मात्र प्रत्यक्षात या गणवेशाचे अनुदान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात किंवा मोफत गणवेश विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी अनेक अडचणींचा डोंगर निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. सुरूवातीला अनुदान न आल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. आता अनुदान येऊनही विद्यार्थी जुन्या गणवेशावर शाळेत येत असल्याचे चित्र आहे. शाळा सुरू झाल्याच्या दहा दिवसाने गणवेशाचे अनुदान पंचायत समिती स्तरावर आले; मात्र अद्याप गणवेश खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. जिल्ह्यात २ हजार ८०० शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे या बदली प्रक्रियेने अनेक ठिकाणी गणवेश वाटपालाही विलंब होत असल्याची ओरड शाळा समितीकडून होत आहे. गणवेशाचे अनुदान मुख्यध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त बँक खात्यावर पडते. त्यामुळे मुख्यध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे संयुक्त बँक खाते आवश्यक असून नविन मुख्यध्यापकांचे बँक खाते हे जुन्याच शाळेवरील शाळा व्यवस्थापन समितीसोबत जोडलेले आहे. बदलीवरून आलेले मुख्यध्यापक नविन ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीसोबत संयुक्त बँक खाते काढत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशाला विलंब होत असून विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर शाळेत यावे लागत आहे.
शिक्षक बदल्यांचा गणवेशाला खोडा
जिल्हा परिषद शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील २ हजार ८०० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यामध्ये बदल्या झालेल्या अनेक शिक्षकांची खाते अद्याप जुन्या शाळेवरील शाळा व्यवस्थापन समितीशी जोडलेले आहे. तर काही शिक्षक शाळेपासून दूर आहेत. त्यामुळे त्यांचे येण्या जाण्यातच दिवस निघून जातो. शिक्षकांच्या बदल्यांमुळे गणवेशाला खोडा निर्माण झाल्याचे दिसून येते.