शिक्षक संघटनांचा संप; बुलडाणा जिल्ह्यातील ९४० प्राथमिक शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:53 PM2019-09-10T13:53:39+5:302019-09-10T13:53:53+5:30
विविध शिक्षक संघटनांनी ९ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जुन्या पेन्शन योजनेसह विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी ९ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. त्यामुळे जिल्ह्यातील ९४० जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इतर काही खाजगी शाळा बंद होत्या. या संपामध्ये जिल्ह्यातील ४ हजार ८०२ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी सहभाग घेतला.
राज्यातील शासकीय-निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबीत मागण्यांवर शासनाने विचार करावा, त्या मागण्या तातडीने सोडवाव्या यासाठी, विविध शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. सर्व संवगार्तील वेतन त्रुटी दूर कराव्यात, खाजगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यालयात असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावे, लिपिक व लेखा लिपिकाच्या ग्रेड वेतन सुधारणा करून समान पदनाम समान काम समान वेतन व सन्मान पदोन्नतीचे टप्पे करावेत, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाºयांना प्रसूती, बाल संगोपन रजा व अन्य सवलती लागू करण्यात याव्या. पदोन्नती व सरळ सेवेने करण्यात येणार नियुक्ती यामधील प्रारंभिक वेतनातील तफावत दूर करण्यात यावी, राज्यातील सर्व चतुर्थ कर्मचाºयांची होणारी वसुली तात्काळ थांबून पदोन्नती शैक्षणिक पात्रतेनुसार करावी, अनुकंपा भरती तात्काळ व विनाअट करावे, सर्व कर्मचाºयांची अर्जित रजा साठवण्याची कमल मर्यादा काढण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये व अन्य कर्मचाºयांप्रमाणे शिक्षकांनाही दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू करावी, शिक्षण व आरोग्य यांच्यावर जीडीपीच्या सहा टक्के खर्च करण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलनाचा लढा शिक्षक व इतर कर्मचाºयांनी सुरू केला आहे.
नवीन पेन्शन योजना लागू करावी, ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी मांडत आहेत. परंतू शासनाचे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर ५ ते ७ सप्टेंबर रोजी शिक्षकांनी काळ्या फिती लाऊन कामकाज केले. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. या संपामध्ये जिल्ह्यातील ५ हजार ५६२ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांपैकी ४ हजार ८०२ शिक्षकांनी संपात सहभाग घेतला. संपामध्ये जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार शिक्षक सहभागी झाले होते.
जि. प. शाळांपाठोपाठ खाजगी शाळाही बंद
जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या १ हजार ४३८ आहे. त्यातील ९४० शाळा ह्या संपामुळे बंद होत्या. उर्वरीत शाळा मात्र सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात ३९८ खाजगी अनुदानीत शाळा आहेत. त्यापैकी बहुतांश खाजगी शाळाही बंद दिसून आल्या.