सातबारा ऑनलाईन प्रणालीत तांत्रिक अडचणी
By admin | Published: April 25, 2015 02:18 AM2015-04-25T02:18:59+5:302015-04-25T02:18:59+5:30
ऑनलाईन प्रणालीच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी; शेतकरी वर्ग हैराण.
मयूर गोलेच्छा/ लोणार शेतकर्यांना हस्तलिखीत सातबार्याऐवजी विनाविलंब सदोष ऑनलाईन संगणीकृत सातबारा देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम महसूल विभागाकडून राबविण्यात येत आहे; परंतु हस्तलिखीत सातबारा आणि संगणीकृत सातबारा यांच्यातील डाटा बर्याच ठिकाणी जुळून येत नसून, अनेक चुका आढळून येत आहेत. अशा प्रकारे ऑनलाईन प्रणालीसाठी उपयोगात आणल्या जाणार्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी वाढल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. राज्यात सातबारा संगणीकरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर चालू आहे. शासनाच्या या महत्त्वकांक्षी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील तहसीलदारांवर यासाठी दबाव टाकून गेल्या वर्षभरापासून संगणीकृत नोंदी झालेल्या सातबार्यांची सीडी ट्रायल रनसाठी पुणे येथे पाठविण्यात भाग पडले; परंतु हे करीत असताना सी.डी.पाठविण्यापूर्वी त्या सीडीची दुसरी प्रिंट जिल्ह्यात दिली नाही. तर काही ठिकाणी पाहिली प्रिंट दिल्या गेली नाही. ट्रायल रनसाठी पुणे येथे सी.डी. पाठवत असताना अशी अपेक्षा होती की, पहिल्या व दुसर्या प्रिंटमध्ये केलेल्या दुरुस्त्या विचारात घेऊन नंतर सिडी पाठविणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे नोंदीनंतरही बर्याचशा चुका संगणीकृत सातबारामध्ये आहेत. फेरफार नोंदीनंतर ऑनलाईनच्या माध्यमातून नोंदीसाठी फेरफारच तलाठी कार्यालयात पोहोचत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. यामुळे पारंपरिक पद्धतीनेच कामकाज करण्याची पुन्हा वेळ आली आहे. सातबार्यावरील फेरफाराच्या नोंदी करण्यासाठी तलाठय़ांना हातातील सर्व काम सोडून तहसील कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे. यामुळे इतर कामांचा खोळंबा होत आहे. हस्तलिखीत ७/१२ चे संगणीकरण झाल्यानंतर फेरफारच्या नोंदी घेताना अनेक अडचणी येत आहेत. तलाठय़ांना दुसरी प्रिंट न देता डाटा ऑनलाईनला दिलेला आहे. यामुळे या डाटामध्ये ५0 ते ६0 टक्के चुका आहेत. सदोष सातबारा शेतकर्यांना वाटप झाल्यास भविष्यात तलाठय़ांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकावे लागू शकते. यामुळे तलाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे तलाठी संघटनेचे उपविभागीय सचिव काशिनाथ इप्पर यांनी सांगितले.