बाहय अंतरंगाचा विकासासोबत तंत्रज्ञानाचे शिक्षण महत्वाचे - मानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:31 PM2018-07-30T13:31:47+5:302018-07-30T13:32:54+5:30
आधुनिकतेशी नाड जोडण्यासाठी त्यांना संगणकाचे तंत्रज्ञान शिकवणेही आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन महात्मा जोतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष सुभाष मानकर यांनी केले.
बुलडाणा : शाळेत शिक्षण घेत असताना शैक्षणिक ज्ञान विद्यार्थी घेत असतात. हे ज्ञान मिळविण्यासोबतच त्यांच्या बाहय व अंतरंगाचा विकास होणे व त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. या सोबतच आजच्या आधुनिकतेशी नाड जोडण्यासाठी त्यांना संगणकाचे तंत्रज्ञान शिकवणेही आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन महात्मा जोतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष सुभाष मानकर यांनी केले. येथील महात्मा जोतिबा उच्च प्राथमिक शाळेमध्ये २८ जुलै रोजी सायंकाळी पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिक स्नेहलता मानकर या होत्या. महात्मा फुले मंडळाचे सचिव इंजि.सुरेश चौधरी, शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश वानेरे, पालक प्रतिनिधी कावेरी अपार यांची विचारमंचावर उपस्थिती होती. यावेळी लोकशाही पध्दतीने शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक घेऊन शालेय मंत्री मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी नियुक्त मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. अक्षय सुसर सभापती, उपसभापती राणी विनोद जाधव व त्यांच्या मंत्री मंडळाला मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर यांनी साक्षी लोखंडे मुख्यमंत्री, वैष्णवी मिसाळ, धीरज वाघ, निखील कोठाळे, गौरी खिरोडकर, राजनंदिनी सुरडकर यांना गोपनियतेची शपथ दिली. या पालक शिक्षक सभेत काशीराम वाघमारे,जीवन पालकर, गौरव जाधव, राधा उबरहंडे, संजय भराड, गजानन वाघ, शारदा मुठ्ठे या पालकांनी सुचना करत आपले मत मांडत मनोगत व्यक्त केले. सभेचे संचलन सुवर्णा खिल्लारे यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश बस्सी यांनी केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधावा
पालकांनी आपल्या पाल्याशी शैक्षणिक संवाद दररोज साधावा व विद्यार्थ्यांच्या परीक्षा, स्पर्धा, चित्रकला, क्रीडा व इतर स्पर्धेत सहभागी होऊ द्यावे, असे आवाहन मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर यांनी केले. प्रकाश वानेरे यांनी आपल्या पाल्यांचा दररोज अक्षर सुधारक्रम घ्यावा, अशी सूचना पालकांना दिली. तर अभ्यासक्रम, खेळ व शारीरिक व्यायाम यात विद्यार्थ्यांचा समन्वय शिक्षक व पालकांनी साधावा, असे मत व्यक्त केले.