तहसील कार्यालयाने सुधारित याद्या बँकेत केल्या सादर!
By Admin | Published: May 22, 2017 12:38 AM2017-05-22T00:38:47+5:302017-05-22T00:38:47+5:30
१४ कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: तहसील कार्यालयाच्या गैरकारभारामुळे चुकीच्या याद्या भारतीय स्टेट बँक शाखा लोणार येथे सादर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऐन पेरणीच्या वेळेवर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशाअभावी पेरणी लांबणीवर टाकावी लागणार होती. यावर ‘लोकमत’ने वृत्त्त प्रकाशित करताच तहसील कार्यालयाने सुधारित याद्या बँकेत सादर केल्या.
सन २०१६ - १७ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस पिकाचा विमा उतरविला नव्हता, अशा शेतकऱ्यांना सदर विमा लाभ रकमेच्या ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यासाठी शासनाने मार्च २०१७ ला तालुक्यासाठी १४ कोटी रुपयांची मदत मंजूर केली होती. परंतु, लोणार तहसील कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे चुकीच्या याद्या भारतीय स्टेट बँक शाखा लोणार येथे सादर करण्यात आल्या. परिणामी ऐन पेरणीच्या वेळेवर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशाअभावी पेरणी लांबणीवर टाकावी लागणार असल्याचे वृत ‘लोकमत’ मध्ये १२ मे रोजी प्रकाशित होताच तहसील कार्यालयाने सुधारित याद्या बँकेत सादर केल्या व १४ कोटी पीक विमा अनुदानाची रक्कम ऐनवेळवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली.
सतत चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने सन २०१६-२०१७ साली ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही, अशा शेतकऱ्यांनासुद्धा शासन स्तरावरून पेरणीसाठी मदत व्हावी, या प्रमुख उद्देशाने शेतकऱ्यांसाठी सदर विमा लाभ रकमेच्या ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यासाठी शासनाने मार्च २०१७ ला लोणार तालुक्यासाठी १४ कोटी रुपयांची मदत मंजूर केली होती. त्यानुषंगाने लोणार तहसील कार्यालयाने शेतकऱ्यांच्या याद्या भारतीय स्टेट बँकेत सादर केल्या. सदर याद्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर चुकीचे खाते नंबर, अर्धवट खाते नंबर अशा त्रुटी असल्यामुळे बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक अनुदानाची रक्कम टाकू शकले नाही. याबाबतचा जाब शेतकरी तहसील कार्यालयाच्या तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना विचारू लागले असता बँकेत याद्या दिल्या आहेत. परंतु, बँकेने अजून खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली नाही, असे सांगून वेळ मारून नेत होते. मात्र लोकमतच्या वृत्त्तानंतर सुधारित याद्या बँकेकडे सादर करण्यात आल्या.