तहसीलदार अशोक टेंभरे, राजेंद्र इंगळे यांची बदली
By Admin | Published: April 17, 2015 01:33 AM2015-04-17T01:33:25+5:302015-04-17T01:33:25+5:30
खामगाव येथे नवनियुक्त तहसीलदार आकाश लिंगाडे रुजू.
खामगाव (जि. बुलडाणा): बनावट रेशन कार्डप्रकरणात वादग्रस्त ठरलेले तहसीलदार टेंभरे व पुरवठा निरीक्षक इंगळे या दोघांची खामगावातून बदली करण्यात आली आहे. नवे तहसीलदार म्हणून आकाश लिंगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वाकारला. येथील तहसील कार्यालयातून वितरित झालेल्या बनावट रेशन कार्डचा आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी सभागृहासमोर पर्दाफाश केला होता. रेशन कार्ड वितरणामधील या अनागोंदी कारभाराबाबत तहसीलदार टेंभरे व पुरवठा निरीक्षक यांच्यावर पुरवठा मंत्री यांनी निलंबनाची कारवाई केली असून, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, याच प्रकरणाचे पडसाद प्रशासकीय वतरुळातही उमटले असून, तहसीलदार टेंभरे व पुरवठा निरीक्षक इंगळे यांची खामगाव येथून बदली करण्यात आली आहे. अशोक टेंभरेंची वाशीम येथे, तर राजेंद्र इंगळे यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमरावती आयुक्त कार्यालयात कार्यरत लिंगाडे यांची खामगाव तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.