प्रभारी तहसीलदार राठोड तडकाफडकी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:08 PM2020-08-01T13:08:36+5:302020-08-01T13:08:49+5:30
अमरावती विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी ३१ जुलै रोजी एक आदेश पारीत केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : तालुक्यातील आलेवाडी येथील शेतीची आपसात वाटणी करण्यासाठी २० हजाराची लाच स्वीकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संग्रामपूरचे प्रभारी तहसीलदार समाधान राठोड यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भात अमरावती विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी ३१ जुलै रोजी एक आदेश पारीत केला आहे.
संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथील नागरिकांनी ३० डिसेंबर २०१९ रोजी शेतीची आपसात वाटणी करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला होता. अर्ज देऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही तहसीलदारांकडून या अर्जावर कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, ३ जून रोजी तहसीलदारांची भेट घेतली असता, त्यांनी ३ जून रोजी तहसील कार्यालयात भेटायचे सांगितले. त्यावेळी वाटणी पत्राबाबत बोलणे झाल्यानंतर तहसीलदारांनी भ्रमण दूरध्वनीवरून संबंधितांना जळगाव जामोद रोडवर बोलावले. या रस्त्यावरील एका निंबाच्या झाडाखाली तहसीलदारांनी सदर वाटणीपत्राचे वीस हजार रूपये रोख घेऊन आठ दिवसाच्या आत काम करून देणार असल्याचे सांगितले. मात्र, पैसे घेऊनही तहसीलदारांनी वाटणी पत्र करून दिले नाही. दरम्यान, याप्रकरणी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केला. त्यानंतर अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी तात्काळ प्रभारी तहसीलदार समाधान राठोड यांना निलंबित करून त्यांना मुख्यालयी अॅटच करण्यात आले आहे. या कारवाईमुळे संग्रामपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.