तहसीलदारांनी घेतला ‘गुरुजींचा’ वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:54+5:302021-01-03T04:34:54+5:30
जवळपास सात तास ही मॅरेथॉन प्रशिक्षणाची बैठक चालली. बुलडाणा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाचे २ जानेवारी रोजी ...
जवळपास सात तास ही मॅरेथॉन प्रशिक्षणाची बैठक चालली. बुलडाणा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाचे २ जानेवारी रोजी तालुक्यातील १०६० शिक्षक व विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या निवडणूक प्रशिक्षण बैठकीत तहसीलदार रुपेश खंडारे यांनी निवडणूक प्रक्रिया कशी राहील, निवडणुकीच्या संदर्भाने कोणती कामे करावी लागणार, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्या तथा खबरदारी घ्यावी याची माहिती दिली.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमास शनिवारी सकाळी १०:३० वाजता प्रारंभ झाला होता. यास नायब तहसीलदार मंजुषा नेताम, अमरसिंह पवार, विद्या गौर, श्याम भामळे यांच्यासह मास्टर ट्रेनर तलाठी पी, बी, गवळी, हर्षाली हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मतदानासाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक व दोन यांना यावेळी मतदान नमुने भरणे, ईव्हीएम हाताळणी, सीएसआर, मॉक पोल, सिलिंग, साहित्य वाटप, तपासणी, मतदान प्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले.
तहसीलदारांचीही घेतली फिरकी
या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान सहभागी शिक्षकांनीही निवडणूक कामाच्या भत्त्यावरून या प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षक बनलेल्या तहसीलदार रुपेश खंडारे यांची फिरकी घेतली. नाही म्हणायला आधी गुरुजींनी विविध कारणे देत निवडणुकीच्या कामाला ‘नकार’ देण्याचे प्रयत्न चालवले होते; मात्र गेल्या दोन दिवसांपासून तहसीलदारांनी यासंदर्भात सर्वांना समजावून सांगत निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला प्रशिक्षणाचा टप्पा मार्गी लावला आहे.
(फोटो आहे)