तापमान ४२ अंशावर : जीवनमान विस्कळीत
By admin | Published: May 14, 2017 08:13 PM2017-05-14T20:13:59+5:302017-05-14T20:13:59+5:30
मोताळा: मोताळ्यासह परिसरात सध्या उन्हाचा पारा जबरदस्त वाढला आहे. काही दिवसांपासून तापमान ४२ अंशापर्यंत जाऊन पोहोचल्याने तालुकाभरातील जीवनमान विस्कळीत झाले आहे.
उन्हामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे रखडली
मोताळा: मोताळ्यासह परिसरात सध्या उन्हाचा पारा जबरदस्त वाढला आहे. काही दिवसांपासून तापमान ४२ अंशापर्यंत जाऊन पोहोचल्याने तालुकाभरातील जीवनमान विस्कळीत झाले आहे. चढत्या पाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागती लटकल्या आहेत.
मागील पंधरवाड्यापासून मोताळा परिसरात तापमानाच्या पाऱ्यात चढ-उतार होत आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण आणि काही प्रमाणात वारा यामुळे तापमान घसरले होते. मात्र आठवडाभरापासून ४२ अंशापर्यंत गेलेले तापमान ३८ ते ३९ अंशापर्यंत कायम आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. रविवारचे तापमान ४२ अंशापर्यंत कायम होते. तापमानातील या अचानक बदलांमुळे नागरिकांना विविध आजारांनादेखील सामोरे जावे लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्यावेळेस शहरासह परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही मोठा झाला आहे. उष्णतेमुळे पाण्याची पातळीही वेगाने घटू लागली आहे. परिसरातील विहीरी, बोअर, लघू प्रकल्प कोरडे पडण्यास सुरवात झाली आहे. दुपारच्यावेळी उन्हाचे असह्य चटके सहर होत नसल्यामुळे याचा मोठा परिणाम शेतकरी, शेतमजुरांवर दिसून येत आहे. दुपारच्यावेळी काम करणे अत्यंत कठीण झाल्याने पेरणीपूर्व मशागती रखडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. मध्यरात्रीनंतर गारवा वाटत असला, तरी सकाळी आठ वाजेपासून उन्हाचे चटके लागत आहेत. काही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे मागे पडू म्हणून रात्रीच्यावेळेस काम करणे सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.