शौचालय अनुदानाचे दहा कोटी थकले; आठ हजार लाभार्थी अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:12 PM2018-09-15T14:12:13+5:302018-09-15T14:12:36+5:30
तीन महिन्यापासून शौचालय अनुदानाचे जवळपास दहा कोटी रुपये शासनाकडे थकीत असल्याची माहिती असून त्यामुळे आठ हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ झालेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
- उध्दव फंगाळ
मेहकर: तालुका २०१२ च्या बेसलाईन सर्व्हेक्षणानुसार हगणदरीमुक्त करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र तालुक्यात स्वच्छ भारत मिशनचे ग्रामीण भागात चित्र वेगळेच आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून शौचालय अनुदानाचे जवळपास दहा कोटी रुपये शासनाकडे थकीत असल्याची माहिती असून त्यामुळे आठ हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ झालेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. मेहकर तालुक्यात मोठा गाजावाजा करून हे अभियान राबविण्यात आले. नागरिकांनी शौचालयांचा वापर करावा म्हणून पंचायत समितीस्तरावरून ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबवून जनजागृतीही करण्यात आली. ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबाला रेशनचा माल, रॉकेलसह अन्य काही वस्तू तथा योजनांचा लाभ न देण्याच्या सुचनाही दिल्या गेल्या होत्या. गट विकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी स्वच्छ भारत मिशनसाठी मेहनत घेऊन तालुका हगणदरी मुक्तीसाठी प्रयत्न केले. त्यानंतर बेसलाईन सर्व्हेक्षणाच्या आधारावर तालुका हगणदरी मुक्त झाल्याचे जाहीर केले गेले. मात्र प्रत्यक्षात वेगळी स्थिती आहे. अनेक खेडेगावातील शौचालयांची स्थिती अर्धवट आहे तर काही ठिकाणी त्यांचा उपयोग होत नाही. दुसरीकडे नागरिकांनी शौचालय बांधून अनुदानासाठी पंचायत समितीकडे अर्ज सादर केलेले आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यापासून शासनाकडे दाह कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी दररोज पंचायत समितीकडे चकरा मारत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
शौचालयाचे थकित असलेले अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी वरिष्ठांकडे पाठ पुरावा सुरू आहे. अनुदान मिळताच त्याचे वाटप करण्यात येईल.
- आशिष पवार गटविकास अधिकारी, मेहकर