वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दहा बकऱ्या ठार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:32 AM2021-04-12T04:32:32+5:302021-04-12T04:32:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : गोठ्यात बांधून ठेवलेल्या बकऱ्यांवर अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला चढवून त्यांना ठार केल्याची घटना तालुक्यातील भरोसा ...

Ten goats killed in wildlife attack | वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दहा बकऱ्या ठार !

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दहा बकऱ्या ठार !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : गोठ्यात बांधून ठेवलेल्या बकऱ्यांवर अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला चढवून त्यांना ठार केल्याची घटना तालुक्यातील भरोसा येथे ११ एप्रिलच्या सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. सदर हल्ला लांडग्यांनी केला असल्याची शक्यता वर्तविली जात असून, यामध्ये १० बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने शेतीला जोड व्यवसाय करणारे शेतकरी समाधान थुट्टे यांचे सुमारे ९० हजारांचे नुकसान झाले आहे.

भरोसा येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान सदाशिव थुट्टे हे आपल्या गट नं. ३१९ मध्ये असलेल्या शेतातील गोठ्यात शेळीपालनाचा जोडव्यवसाय करतात. दरम्यान, शेतात पिके असल्यामुळे व बकऱ्यांचा सांभाळ करण्यासाठी रात्री ते गोठ्यातच मुक्कामाला होते. दरम्यान, ११ एप्रिलच्या सकाळी उठून गावात गेले असता शेतातील मका पिकात दबा धरून बसलेल्या वन्यप्राण्याने गोठ्यातील बकऱ्यांवर हल्ला चढवून गोठ्यातील ६ बोकड व ३ शेळ्यांना ठार केल्याचे उघडकीस आले. यामध्ये शेतकरी समाधान थुट्टे यांचे सुमारे ९० हजारांचे नुकसान झाले आहे. गोठ्यातील मृत बकऱ्यांची अवस्था पाहता सदरचा हल्ला लांडग्याने केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तथापि, अंचरवाडी व भरोसा शिवारात दोन दिवसांपूर्वी चार लांडग्यांचा मुक्त वावर सुरू असल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली.

दरम्यान, याबाबत माहिती मिळाली असता महसूल विभागाच्या वतीने या भागाचे तलाठी हरिभाऊ उबरहंडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. युवराज रगतवान, वन विभागाचे मेरत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. यावेळी शेख, डॉ. सुधाकर सुरडकर, पोलीस पाटील लक्ष्मण लेंढे, समाधान सदाशिव थुट्टे, संतोष थुट्टे, समाधान धोंडगे, साहेबराव थुट्टे, दिलीप थुट्टे, सागर थुट्टे, रघुनाथ थुट्टे, गणेश सिरसाठ आदी शेतकरी उपस्थित होते, तर या घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, पत्रकार उद्धव थुट्टे, अ‍ॅड. गणेश थुट्टे, कार्तिक खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन धीर देण्यासह शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

शेतकऱ्याची चिंता वाढली

भरोसा भागात असलेला कालवा, तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे उपलब्ध जलसाठा आणि या जलसाठ्याच्या भरवशावरील उन्हाळी पिकांमुळे वन्यप्राण्यांना या भागात पाण्यासह चाराही उपलब्ध आहे. परिणामी रोही, हरिण, रानडुक्कर आदी पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांना जागलीवर जावे लागते. त्यात आता लांडग्यांची भर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

कॅप्शन : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या बकऱ्यांची पाहणी करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेतकरी.

..............................

Web Title: Ten goats killed in wildlife attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.