ठाणेदारांसह दहा पोलीस जखमी

By admin | Published: May 15, 2015 11:41 PM2015-05-15T23:41:29+5:302015-05-15T23:41:29+5:30

सात आरोपींना अटक ; पोलीस कर्मचा-यांवर दगडफेक प्रकरण.

Ten policemen including the Thane police were injured | ठाणेदारांसह दहा पोलीस जखमी

ठाणेदारांसह दहा पोलीस जखमी

Next

बुलडाणा : छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीतील डीजे बंद करण्याच्या कारणावरून एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवर दगडफेक केली. या दगडफेकीत ठाणेदारांसह दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना १४ मे रोजी रात्री ९.३0 वाजेच्या सुमारास शहरातील ईकबाल चौकात घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी शेकडो जणांवर गुन्हे दाखल केले असून, सात जणांना अटक केली आहे. आज या आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने २0 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धर्मवीर आखाड्याच्यावतीने काल १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासने चौकाचौकात चोख बंदोबस्त ठेवला होता. संगम चौकातून सुरू झालेली मिरवणूक जनता चौकात येताच काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी मिरवणुकीतील डीजे बंद करा, अशी मागणी केली; परंतु ही मागणी पोलिसांनी धुडकावून लावल्यामुळे संतप्त लोकांनी पोलीस कर्मचार्‍यांवर दगडफेक केली. या दगडफेकीत ठाणेदार तांदळेंसह दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर या दगडफेकीत मिरवणुकीतील काही महिलासुद्धा जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे इकबाल व जनता चौक परिसरात एक ते दीड तास तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने पटापट बंद केली होती. यावेळी परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ मिरवणूक पुढे नेत दोन्ही समाजाच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शामराव दिघावकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सूर्यकांत बांगर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी गुरुवार रात्रीपासूनच अटक सत्र सुरू करून सात आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये मो. दानिश, शेख सलमान, शेख समिर, इस्माईल शहा रज्जाक शहा, शेख अकील शेख इमाम, शेख सलमान शेख छोटू व शेख जमीर शेख इमाम यांचा समावेश आहे. आज या आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने २0 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Ten policemen including the Thane police were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.