रोहयोच्या मजुरीत दहा रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:14+5:302021-04-06T04:33:14+5:30
बुलडाणा : रोहयो योजनेत काम करणाऱ्या मजुरांना पूर्वी २३८ रुपये रोजगार दिला जायचा. आता यामध्ये आणखी दहा रुपयांची वाढ ...
बुलडाणा : रोहयो योजनेत काम करणाऱ्या मजुरांना पूर्वी २३८ रुपये रोजगार दिला जायचा. आता यामध्ये आणखी दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे रोहयो मजुरांना २४८ रुपये रोजगार मिळणार आहे.
---
सोयाबीनने ओलांडला सहा हजारांचा टप्पा
बुलडाणा : हंगामपूर्व, मध्य हंगाम आणि हंगाम संपल्यानंतरही भाव खात असलेल्या सोयाबीनच्या दरात आणखी तेजी येणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, सध्या सोयाबीनचे दर सहा रुपये क्विंटलपेक्षा अधिक झाले आहेत.
---
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या
बुलडाणा : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी केली आहे.
----
गहू, मका आणि ज्वारी नोंदणी केंद्र सुरू
बुलडाणा : रब्बी हंगाम २०-२१ मध्ये राज्य शासनाच्या आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने बुलडाणा येथे गहू, मका आणि ज्वारी नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
---
शिवकुमार, रेड्डीला फाशी द्या
मोताळा : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी शिवकुमार आणि एम.एस. रेड्डीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सविता पिंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
...........
अंजनी येथे तीव्र पाणी टंचाई
मेहकर : तालुक्यातील अंजनी येथे गत काही दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाणी टंचाईकडे गावपुढारी आणि सचिव दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून येथील पाणी टंचाई निर्मूलनासाठी प्रयत्न व्हावेत.
-----
रक्तदान करण्याचे आवाहन
बुलडाणा : जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी रापी ब्रिगेडच्या वतीने मनू सावरकर यांनी केली आहे. कोरोनाकाळात रक्तदानातून सामाजिक दायित्व पार पाडावे, असे त्यांनी म्हटले आहे.
------
राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा
बुलडाणा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुद्धिस्ट इंटरनॅशनल युवा फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्च स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन किशोर तुमोने यांनी केले आहे.
----
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
मोताळा : तालुक्यातील शेलापूर येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित युवकांनी रक्तदानाचा संकल्पही केला.
---
विमा रक्कम खात्यावर जमा करा
बुलडाणा : कोरोना आपत्तीमुळे शासनाने पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी सुदेश गुलभेले यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
---
गोरगरिबांना आर्थिक मदत द्या!
मोताळा : तालुक्यातील गोरगरीब आणि दुर्बल घटकांतील नागरिकांना कोरोना कालावधीत आर्थिक मदत देण्याची मागणी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात ओमप्रकाश कुटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
प्लास्टिकचा वापर पुन्हा वाढला
चिखली : येथे कोरोना कालावधीतच पुन्हा प्लास्टिकचा सर्रास वापर होत आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने सर्वत्र कचरा पसरल्याचे दिसून येते.
---
आठवडी बाजारात नागरिकांची गर्दी
सिंदखेड राजा : येथील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांकडून गर्दी केली जात आहे. या वेळी कोविड आपत्ती व्यवस्थापन कायद्याचीही पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे बाजार बंद करून वॉर्डात हातगाडीवर भाजीपाला उपलब्ध करून बाजार बंद करणे आवश्यक आहे.
----