दहा हजार कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:11 PM2020-11-07T12:11:15+5:302020-11-07T12:11:25+5:30
Buldhana News बुलडाणा जिल्ह्यातील दहा हजार कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम ही लस देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी गेल्या सात ते आठ महिन्यापासून युद्धपातलीवर राबणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील दहा हजार कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम ही लस देण्यात येणार आहे. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर अद्यापही अनुषंगीक माहितीचे संकलन सुरू असून यासंदर्भातील अहवाल अद्याप अंतीम झालेला नाही. अंतिम अहवालाचा विचार करता जिल्ह्यात १४ हजारांच्या आसपास पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांची संख्या जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.अद्याप कोरोना लस उपलब्ध झालेली नसली तरी संभाव्य लस उपलब्ध झाल्यास ती प्रथमत: कोरोना लढल्यात जमीनस्तरावर काम करणाऱ्या पहिल्या टप्प्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ती देण्यात येणार आहे.
त्यासंदर्भाने गेल्या आठ ते दहा दिवसापासून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक ही माहिती सविस्तर संकलीत करत आहेत. यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातंर्गत यंत्रणा कार्यरत असून जिल्ह्यातील तब्बल ५०९ संस्थांकडून या माहितीचे संकलन केले जात आहे. त्यामुळे ही माहिती संकलीत करण्यात बऱ्याच अडचणी जात आहे.
वर्तमान स्थितीत जिल्हा शल्यचिकित्सक कायार्लयातंर्गत असलेल्या १६ संस्थां तथा जिल्हा आरोग्य विभागाकडून ८७ शासकीय संस्थांतील अनुषंगीक कर्मचारी, अधिकारी यांची माहिती संकलीत केली जात आहे. पाच नोव्हेंबर पर्यंत पहिल्या फळीत काम करणाऱ्या जवळपास १० हजार ४९५ कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत झाली आहे. यासोबतच ४४० खासगी रुग्णालयातीलही कर्मचारी, डॉक्टरांची माहिती संकलीत केल्या जात आहे.