बसचालकास मारहाण करणाऱ्यास दहा हजार रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 03:35 PM2020-02-16T15:35:40+5:302020-02-16T15:35:48+5:30
जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक ऐ. ढुमणे यांनी आरोपीस दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
बुलडाणा: एसटी बस चालकास मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस दहा हजार रुपये दंडाची शिक्षा १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. शेलगाव आटोळ येथे ६ आॅक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली होती.
चिखली आगारातील बसचालक विनोद दत्तू वरपे व वाहक वैशाली गायकवाड हे ६ आॅक्टोबर २०१७ रोजी चिखली येथून अंचरवाडी येथे एसटी बस (क्रमांक एम-एच-४०-एन-९६९१) घेऊन जात होते. शेलगाव आटोळ येथे बसमध्ये निवृत्ती सुभाष पवार या प्रवाशाने गोंधळ घातला. बसचालकाने हटकले असता, निवृत्ती पवार याने चालकास मारहाण केली. याप्रकरणी बसचालक विनोद वरपे यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी निवृत्ती पवार (रा. शेलगाव आटोळ) विरूद्ध गुन्हा दाखल केला. चौकशीअंती आरोपी निवृत्ती पवार याच्याविरूद्ध दोष निश्चित केला. पुढे हे प्रकरण पुराव्यासाठी वि. न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयामध्ये आले. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक ऐ. ढुमणे यांनी आरोपीस दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकिल अॅड. एस. पी. हिवाळे यांनी बाजू मांडली. त्यांना तपासअधिकारी पोलीस हेड काँस्टेबल शेळके यांनी सहकार्य केले.