पत्रावळीवरून गाडी नेल्याच्या कारणावरून वाद, बोहरीपुऱ्यात तणाव
By अनिल गवई | Published: July 29, 2023 12:04 AM2023-07-29T00:04:55+5:302023-07-29T00:05:01+5:30
शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली घटना
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि.बुलढाणा: देवीच्या भंडाऱ्यात जेवणावळ सुरू असताना परस्परविरोधी समाजाच्या युवकाने पत्रावळीवरून दुचाकी नेल्याच्या किरकोळ कारणावरून वाद उद्भवल्याने बोरीपुऱ्यात दगडफेक झाली. ही घटना शुक्रवारी रात्री १०.३० वा. घडली. या घटनेमुळे बोरीपुऱ्यासह फरशी भागात तणाव निर्माण झाला होता.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, देवीच्या भंडाऱ्यात जेवणावळ सुरू असताना मेहबुब नगरातील एका युवकाने पत्रावळीवरून दुचाकी नेली. याबाबत त्याला हटकले असता त्याने काही जणांशी वाद घातला. शाब्दीक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. ही घटना युवकाने आपल्या भागात जावून सांगितल्यानंतर तेथील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तुरळक दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरूण परदेशी, विवेक पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र त्याचवेळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटातील मोठ्या संख्येने जमाव जमला. त्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी साैम्य लाठी चार्ज केला. याप्रकरणी एका युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. घटनास्थळी आता तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते.