अज्ञात समाजकंटकाने लावलेल्या ध्वजाने तणाव
By योगेश देऊळकार | Published: January 28, 2024 06:27 PM2024-01-28T18:27:48+5:302024-01-28T18:28:01+5:30
लोणार रोडवर असलेल्या विशिष्ठ धर्माच्या प्रार्थना स्थळावर दुसऱ्या धर्माचा ध्वज लावलेला असल्याचा प्रकार उघडकीस
सुलतानपूर : येथील विशिष्ट धर्माच्या प्रार्थनास्थळावर अज्ञात समाजकंटकाने दुसऱ्या धर्माचा ध्वज लावल्याचा प्रकार २८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आला. मेहकर पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून तिन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या सुलतानपुरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
येथील लोणार रोडवर असलेल्या विशिष्ठ धर्माच्या प्रार्थना स्थळावर दुसऱ्या धर्माचा ध्वज लावलेला असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने येथे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या बाबतची फिर्याद शे. अखतर शे. कौसर (वय ४६) यांनी मेहकर पोलिस स्टेशन दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादवी कलम २९५ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक राजेश शिगटे व पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पाटील यांनी सुलतानपूर येथे पोहचून दोन्ही समाज बाधवांशी चर्चा करून वातावरण शांत केले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे करीत आहेत. हे.कॉ. लक्ष्मण कटक, पो.कॉ. शिवानंद तांबेकर, सुनील नागरे व त्यांचे सहकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
आरोपीचा शोध घेऊन कारवाईची मागणी
सुलतानपुरात सर्वधर्मीय समाज बांधव अनेक पिढ्यांपासून अत्यंत बंधुभावाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात राहतात. मात्र, हा घडलेला समाज विघातक असा निंदनीय प्रकार लक्षात घेता पोलिसांनी या घटनेतील आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.